सावंतवाडी : सावंतवाडी नगरपालिकेची कौन्सिल बैठक सुरू होताच विरोधी पक्षनेते संजू परब यांनी प्रशासनावर जोरदार हल्लाबोल करत सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. बैठकीची नोटीस सदस्यांना मूळ स्वरूपात न देता झेरॉक्स प्रत देण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना थेट जाब विचारला.
“सभेची नोटीस आम्हाला झेरॉक्स स्वरूपात का दिली जाते? मूळ नोटीस का दिली जात नाही? लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीने नोटीस देणे योग्य आहे का?” असा संतप्त सवाल संजू परब यांनी मुख्याधिकाऱ्यांना केला. त्यांच्या या प्रश्नामुळे काही काळ सभागृहात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले.
यावेळी परब यांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत, “यापुढे मला अशा प्रकारची झेरॉक्स नोटीस येता कामा नये. लोकप्रतिनिधींचा सन्मान राखला गेला पाहिजे,” अशी स्पष्ट भूमिका मांडली.
संजू परब यांच्या आक्रमक भूमिकेनंतर मुख्याधिकाऱ्यांनी ही चूक झाल्याची कबुली देत यापुढे अशी त्रुटी होणार नसल्याचे आश्वासन दिले. “ही चूक आमच्याकडून झाली असून भविष्यात अशी पुनरावृत्ती होणार नाही,” असे त्यांनी सभागृहात स्पष्ट केले.
दरम्यान, बैठकीच्या सुरुवातीलाच या मुद्द्यावर झालेल्या चर्चेमुळे सभागृहाचे वातावरण तापले होते. संजू परब यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची सदस्यांमध्येही चर्चा रंगली.



