‘त्या’ रस्त्याच्या निकृष्ट कामावर आमदार दीपक केसरकर ॲक्शन मोडवर! ; मुंबईत मुख्य अभियंत्यांची घेतली भेट, MSIDC चे मुख्य अभियंता रणजित हांडे पुढील आठवड्यात करणार प्रत्यक्ष पाहणी.

मुंबई / सावंतवाडी : विकासकामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश देत आमदार दीपक केसरकर यांनी रामघाट रस्त्याच्या निकृष्ट कामाबाबत थेट मुंबई गाठून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. त्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आता संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली असून पुढील आठवड्यात प्रत्यक्ष पाहणीचा मार्ग मोकळा झाला आहे.
नुकतीच आमदार केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्याचा दौरा करून विविध विकासकामांची पाहणी केली होती. यावेळी राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSIDC) अंतर्गत ईपीसी मॉडेलवर सुरू असलेल्या कोल्हापूर–नागणवाडी–चंदगड–रामघाट–दोडामार्ग–असनोडा राज्यमार्ग क्र. १८९ या महत्त्वाकांक्षी रस्ते प्रकल्पाच्या कामाची त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान रस्त्याच्या काही भागात कामाचा दर्जा समाधानकारक नसल्याचे आणि निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेत आमदार केसरकर यांनी मुंबई येथे MSIDC चे मुख्य अभियंता रणजित हांडे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी संबंधित कामातील त्रुटींचा तपशील सादर करत नागरिकांच्या भावना आणि तक्रारी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवल्या.
आमदार केसरकर यांच्या पाठपुराव्याची दखल घेत मुख्य अभियंता रणजित हांडे यांनी पुढील आठवड्यात दोडामार्ग दौरा करून संबंधित रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आश्वासन दिले. तसेच तक्रारींची शहानिशा करून आवश्यक त्या सुधारात्मक उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दोडामार्गच्या विकासासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे आमदार दीपक केसरकर यांनी पुन्हा एकदा कामाच्या गुणवत्तेचा मुद्दा ऐरणीवर आणत प्रशासनाला सजगतेचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता रामघाट रस्त्याच्या कामातील त्रुटींवर काय कारवाई होते, याकडे संपूर्ण दोडामार्ग तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles