सावंतवाडी : “माझी गावात इज्जत घालवली” या कारणावरून संतापलेल्या दोघांनी एका दाम्पत्याला दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना सांगेली येथे घडली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, भास्कर वामन गावडे (वय ५०) व शुभम दत्ताराम गावडे (वय २९, दोघेही रा. सांगेली) यांनी पुरुषोत्तम रामचंद्र राऊळ व त्यांची पत्नी प्रमिला पुरुषोत्तम राऊळ यांना शुल्लक कारणावरून मारहाण केली. “माझी गावात इज्जत घालवली” असा आरोप करत दोघांनी राऊळ दाम्पत्यावर दांडक्याने हल्ला केला. तसेच डोक्यावर व हातावर मारहाण करत लाथाबुक्क्यांनीही मारहाण केली. यावेळी शिवीगाळ करून “तुम्हाला सोडणार नाही” अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
ही घटना आज दुपारी सुमारे २ वाजण्याच्या सुमारास श्री. राऊळ यांच्या घरासमोर घडली. याप्रकरणी सावंतवाडी पोलीस ठाण्यात भास्कर गावडे व शुभम गावडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार दीपक शिंदे करीत आहेत.



