मालवण : तालुक्यातील ओझर विद्यामंदिर कांदळगाव प्रशालेमध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस- वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला ओझर विद्यामंदिरची आदर्श विद्यार्थिनी कुमारी भूमिका सदानंद कोचरेकर हिच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तकांचे सामूहिक वाचन केले. या सामूहिक वाचनामध्ये विद्यार्थ्यांबरोबर सर्व शिक्षकही समाविष्ट झाले होते. पुस्तकांचे वाचन करून झाल्यानंतर शाळेचे शिक्षक पी.के.राणे व डी.डी. जाधव सर यांनी वाचलेल्या पुस्तकावर अभिप्राय व्यक्त केला. त्यानंतर इयत्ता दहावीची प्रतिभावान विद्यार्थिनी कुमारी संचिता संदेश परब या विद्यार्थिनीने ‘शिक्षणातून मला काय हवे?’ या विषयावर भाषण केले. वाचनातून आणि शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग दैनंदिन जीवनात करता आला पाहिजे, असे तिने आपल्या भाषणातून सांगितले.
या कार्यक्रमाप्रसंगी मालवण येथील सेवांगणच्या संचालिका ऋतुजा केळकर ह्या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या अमोघ वक्तृत्व व कथाकथन शैलीने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करून वाचनाचे महत्त्व पटवून दिले. ‘वाचनाने माणूस घडतो.’ हा विचार त्यांनी अनेक उदाहरणांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. तसेच ओझर विद्यामंदिरमध्ये मालवण सेवांगणच्यावतीने अनेक संस्कारक्षम उपक्रम राबविणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेवटी प्रशालेच्या प्रभारी मुख्याध्यापकांनी सर्व उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.