सावंतवाडी : वराह चोरी व मोटारसायकल चोरीसारख्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या सुनील उर्फ सनी बाळू पाटील (वय ३८, रा. जिमखाना मैदानाजवळ, सबनीसवाडा, सावंतवाडी) याच्याविरुद्ध सावंतवाडी पोलिसांनी सादर केलेला हद्दपारीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. मा. उपविभागीय दंडाधिकारी तथा प्रांताधिकारी यांनी आदेश देत त्याला सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.
सावंतवाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक यांच्या माध्यमातून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. आदेश बजावल्यापासून पुढील दोन वर्षे संबंधित इसमास या तीन जिल्ह्यांच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
हद्दपारीचा आदेश पोलीस हवालदार प्रवीण वालावलकर व लक्ष्मण काळे यांनी संबंधितास बजावला. त्यानंतर हद्दपारीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. सध्या सुनील पाटील हा बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथे वास्तव्यास गेला असून, त्याबाबतची माहिती व पत्ता सावंतवाडी पोलिसांनी निपाणी पोलीस ठाण्यास कळविला आहे.
दरम्यान, संबंधिताविरुद्ध वराह चोरी तसेच मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक निलेश परब यांनी तयार करून वरिष्ठ कार्यालयामार्फत सादर केला होता. पोलिसांच्या या कारवाईमुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.



