सावंतवाडीत डेंगूसदृश्य पाच रुग्ण, ताप आटोक्यात न आल्यास तातडीने रक्ततपासणी करा! ; जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांचे आवाहन.

सावंतवाडी, ता. २२ : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात डेंगूसदृश्य लक्षणे असलेले पाच रुग्ण उपचारासाठी दाखल असून ते वेगवेगळ्या गावांतील असल्याची माहिती जीवनरक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली. नागरिकांनी तापाकडे दुर्लक्ष न करता वेळेत वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांमध्ये ओटवणे, भटवाडी, कोणसी, रायवाडी, विलवडे, धनगरवाडी, मोरे, गोसावीवाडी, माजगाव तसेच गुलाबी तिठा परिसरातील रुग्णांचा समावेश आहे. या सर्वांवर उपजिल्हा रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.

माजगाव येथील एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. संबंधित रुग्णाच्या रक्तातील प्लेटलेट्सची संख्या केवळ ४० हजारांवर आल्याचे तपासणीत आढळून आले. खबरदारीचा उपाय म्हणून त्याला तत्काळ उच्चस्तरीय उपचारासाठी पाठविण्यात आले.

मसुरकर यांनी सांगितले की, अनेकजण ताप आल्यानंतर डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःच औषधे घेतात. मात्र सलग तीन दिवस ताप कायम राहिल्यास सीबीसी रक्त तपासणी करून घेणे आवश्यक आहे. या तपासणीतून डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड, व्हायरल फिव्हर, कावीळ, न्यूमोनिया आदी आजारांचे निदान करण्यात डॉक्टरांना मदत होते.

डेंगूसदृश्य आजाराचा प्रसार प्रामुख्याने साचलेल्या पाण्यात वाढणाऱ्या डासांमुळे होतो. घराभोवती असलेली घाणीची डबकी, टायर, फुलांच्या कुंड्या किंवा अन्य ठिकाणी साचलेले पाणी त्वरित हटविणे आवश्यक आहे. तसेच परिसर स्वच्छ ठेवून झाडीझुडपे काढल्यास मलेरियाचा धोका कमी होऊ शकतो.

नागरिकांनी शुद्ध पाणी पिणे, तापाची नियमित तपासणी करणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधोपचार टाळणे गरजेचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. प्रत्येक घरात डिजिटल थर्मामीटर असावे, असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, ताप, अंगदुखी, अशक्तपणा किंवा इतर गंभीर लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात अथवा रुग्णालयात जाऊन वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य क्षेत्रातील जाणकारांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles