जन्मदाखल्यासाठी नागरिकांची फरफट!, CRS पोर्टलच्या नावाखाली प्रशासनाचा गलथान कारभार? : माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर आक्रमक. ; पंधरा दिवसांपासून जन्म नोंद दाखले रखडले, शाळा, कॉलेज, पासपोर्ट, आधारसाठी नागरिक हैराण!

सावंतवाडी : राज्यभरात सीआरएस (Civil Registration System) पोर्टल अद्ययावत करण्याचे कारण पुढे करत गेल्या दोन आठवड्यांहून अधिक काळ जन्म नोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. जन्मदाखल्यासाठी नागरिकांना कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागत असून प्रशासन मात्र केवळ “पोर्टल अपडेट सुरू आहे” या एका उत्तरावर वेळ मारून नेत असल्याचा आरोप माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी केला आहे.

आजच्या डिजिटल युगात जन्म नोंद दाखला हा प्रत्येक नागरिकासाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज ठरला आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी, पासपोर्ट काढण्यासाठी, आधार कार्ड, शासकीय योजना तसेच विविध कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी जन्मदाखला आवश्यक असतो. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून हा दाखला मिळत नसल्याने पालक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत.

याबाबत प्रशासनाकडे विचारणा केली असता सीआरएस पोर्टल अद्ययावत करण्याचे काम सुरू असल्याने दाखले देण्यास विलंब होत असल्याचे कारण सांगण्यात येत आहे. मात्र हा प्रश्न केवळ एका शहरापुरता मर्यादित नसून संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवत असल्याची माहिती समोर येत आहे.

“जन्म नोंद दाखला मिळवणे हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे. पोर्टल अपडेट होत असेल तर त्याचा फटका सामान्य नागरिकांना का बसावा? शासनाने अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देणे आवश्यक होते,” असा सवाल बबन साळगावकर यांनी उपस्थित केला.

पूर्वी जन्म नोंद रजिस्टर तपासून लेखी स्वरूपात दाखले देण्याची पद्धत होती. आजही संबंधित नोंदी उपलब्ध असताना नागरिकांना तात्पुरते लेखी दाखले देण्यात कोणतीच अडचण नसावी. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांचे प्रवेश सुरू असताना विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने पर्यायी यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दरम्यान, जन्मदाखल्यासाठी हेलपाटे मारणाऱ्या नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली असून, हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी न लागल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांकडून दिला जात आहे. शासन आणि संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन नागरिकांची होत असलेली गैरसोय तातडीने दूर करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles