✍️ रूपेश पाटील.
पुणे/ दोडामार्ग : ग्रामविकास आणि लोकाभिमुख प्रशासन अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी दोडामार्ग पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेत पुणे येथील यशदा (यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी) येथे आयोजित विशेष प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पंचायत समितीच्या सभापती, उपसभापती तसेच सदस्यांचा समावेश असलेले शिष्टमंडळ प्रशिक्षणासाठी पुण्याकडे रवाना झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांवर विकासकामांची मोठी जबाबदारी असून शासनाच्या विविध योजना, बदलते कायदे, प्रशासनातील नव्या कार्यपद्धती तसेच नागरिकांना अधिक सक्षम सेवा देण्यासाठी लोकप्रतिनिधींना अद्ययावत ज्ञान असणे आवश्यक ठरते. याच पार्श्वभूमीवर दोडामार्ग पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या ज्ञानात भर घालण्यासाठी आणि प्रशासनातील बारकावे आत्मसात करण्यासाठी यशदा येथे आयोजित प्रशिक्षणाला प्राधान्य दिले आहे.
या प्रशिक्षणादरम्यान ग्रामीण विकास, पंचायत राज व्यवस्था, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, आर्थिक नियोजन, लोकसहभाग, पारदर्शक प्रशासन, डिजिटल सेवा तसेच विकासकामांच्या गुणवत्तेबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. प्रशिक्षणातून मिळणाऱ्या ज्ञानाचा उपयोग दोडामार्ग तालुक्यातील विकासकामांना अधिक गती देण्यासाठी आणि नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे सोडविण्यासाठी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या प्रशिक्षणासाठी पंचायत समितीच्या सभापती पार्वती गवस, उपसभापती गणेशप्रसाद गवस तसेच सदस्य स्नेहा गवस, सायली निंबाळकर आणि सोनिया नाईक सहभागी झाले आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बळकटीकरणासाठी आणि प्रशासन अधिक लोककेंद्रित करण्याच्या दृष्टीने दोडामार्ग पंचायत समितीच्या लोकप्रतिनिधींनी घेतलेला हा पुढाकार निश्चितच कौतुकास्पद मानला जात असून तालुक्याच्या विकासाला त्याचा सकारात्मक लाभ होईल, असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जात आहे.



