वेंगुर्ला : सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने मोठा कहर घडवला असून, ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक फटका वेंगुर्ला-बेळगाव राज्य मार्गावरील कामळेवीर बाजारपेठ परिसराला बसला आहे. येथे तब्बल शंभर वर्षे जुने मानले जाणारे एक अजस्र वडाचे झाड मुख्य रस्त्यावरच कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.
झाड इतके विशाल होते की ते थेट रस्त्यालगतच्या मुख्य वीजवाहिन्यांवर कोसळले. त्यामुळे वीजेचे खांब व तारांचे मोठे नुकसान झाले असून संपूर्ण परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. घटनेनंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते श्री. तुळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, झाड कोसळण्याची घटना अचानक घडली. सुदैवाने त्यावेळी झाडाखाली कोणतेही वाहन किंवा नागरिक नसल्याने मोठी जीवितहानी टळली. अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता आली नसती.
दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाच्या संथ हालचालींवर स्थानिक ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वीज वितरण कंपनीने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन वीजवाहिन्यांची दुरुस्ती करून वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी जोर धरत आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि संबंधित यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करत आधुनिक यंत्रसामग्रीच्या सहाय्याने रस्त्यावर आडवे पडलेले हे महाकाय वडाचे झाड त्वरित हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी आग्रही मागणी नागरिक व वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.




