सावंतवाडी : शहरातील भटवाडी-काजरकोंड परिसरात घरोघरी जाऊन मदतीसाठी पैसे मागणाऱ्या तीन संशयित व्यक्तींना सावंतवाडी पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. स्थानिक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी सखोल पडताळणी केल्यानंतर हे तिघे जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याची कार्यवाही करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भटवाडी-काजरकोंड परिसरातील एका घरात मुस्लिम वेश परिधान केलेले दोन पुरुष आणि एक युवती प्रवेश करून आर्थिक मदतीची मागणी करत होते. त्यांच्या वागण्या-बोलण्याबाबत संशय आल्याने संबंधित नागरिकांनी तातडीने स्थानिक हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला.
कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली असता हे तिघेही स्थानिक नसल्याचे लक्षात आले. तसेच त्यांची हिंदी भाषेची बोलीही वेगळी असल्याने संशय अधिक बळावला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी तत्काळ सावंतवाडी पोलिसांना माहिती दिली.
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तिघांना ताब्यात घेतले आणि पुढील चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणले. प्राथमिक चौकशीत त्यांनी जम्मू-काश्मीर राज्यातील कुपवाडा जिल्ह्यातील मणीगा (शेखपुरा) येथील रहिवासी असल्याची माहिती दिली.
पोलिसांनी त्यांच्या आधारकार्डावरील पत्त्यांची शहानिशा करण्यासाठी संबंधित पोलीस ठाणे, बीट अंमलदार तसेच गावच्या सरपंचांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून माहितीची खातरजमा केली. पडताळणीअंती हे तिघे फिरस्ते स्वरूपात विविध ठिकाणी जाऊन मदत मागत असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी आवश्यक नोंद करून त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याची कार्यवाही केली.
दरम्यान, अनोळखी किंवा संशयास्पद व्यक्तींना घरात प्रवेश देऊ नये, तसेच अशा प्रकारची कोणतीही बाब निदर्शनास आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सावंतवाडी पोलिसांनी नागरिकांना केले आहे.



