✍️ शशिकांत मोरे.
रोहा : पत्रकारांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप असलेल्या खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याविरोधात रोहा प्रेस क्लब आक्रमक झाला असून, या प्रकरणाचा तीव्र निषेध करत संबंधितांवर तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी रोहा पोलीस ठाण्यात निवेदनाद्वारे करण्यात आली.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद आणि रायगड प्रेस क्लब यांच्या आवाहनानुसार शुक्रवारी सायंकाळी रोहा प्रेस क्लबच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस प्रशासनाला निवेदन सादर केले. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या आंदोलनात पत्रकारांवरील धमक्या या लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर थेट हल्ला असल्याचा तीव्र सूर उमटला.
निवेदनात पत्रकारांशी बोलताना वापरण्यात आलेली अवमानकारक भाषा, शिवीगाळ आणि धमकीवजा वक्तव्ये अत्यंत निषेधार्ह असल्याचे नमूद करण्यात आले. पत्रकार हे लोकशाहीचा चौथा स्तंभ असून जनतेचे प्रश्न निर्भीडपणे मांडण्याचे काम करतात. त्यामुळे त्यांना धमकावणे, त्यांच्या कामात अडथळे निर्माण करणे किंवा भीतीचे वातावरण तयार करणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा रोहा प्रेस क्लबने दिला.
यावेळी सध्याच्या राजकारणात सभ्यता, संयम आणि सुसंस्कृतपणा जपणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. पत्रकारांचा अवमान करणाऱ्या आणि धमकी देणाऱ्या लोकप्रतिनिधींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी ठाम मागणी करण्यात आली.
या प्रसंगी रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे, रायगड प्रेस क्लबचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, कार्याध्यक्ष सुहास खरीवले, सचिव रविंद्र कान्हेकर, उपाध्यक्ष जितेंद्र जाधव, अंजुम शेट्ये, मुख्य संघटक संदीप सरफळे, दीपक भगत, प्रसिद्धी प्रमुख नंदकुमार मरवडे, संतोष सातपुते, सागर जैन, उद्धव आव्हाड, महेंद्र मोरे, राकेश मोरे, भिवा पवार यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते.
निवेदनाद्वारे संबंधित वक्तव्याची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. पत्रकारांच्या सन्मानासाठीचा हा लढा यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.



