सावंतवाडी : गोव्यातील ‘पेडणे-बार्देश गोवा ट्रक ओनर्स असोसिएशन’च्या मनमानी कारभारामुळे सावंतवाडी तालुक्यातील पारंपरिक चिरेखाण उत्खनन व विक्री व्यवसाय अक्षरशः संकटात सापडला असून, याचा फटका शेकडो व्यावसायिक, वाहनधारक, चालक, मजूर आणि त्यांच्या कुटुंबीयांना बसत आहे. या प्रश्नावर तातडीने तोडगा निघावा यासाठी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे आणि आमदार निलेश राणे यांचे लक्ष वेधण्यात येणार असून, चिरेखाण व्यावसायिकांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांनी व्यक्त केला.

याचवेळी त्यांनी गोवा असोसिएशनला थेट इशारा देत सांगितले की, “या प्रश्नावर सकारात्मक तोडगा निघेपर्यंत सावंतवाडी तालुक्यातील ४० चिरेखाणीतून एकही गाडी गोव्यात जाणार नाही. एवढेच नव्हे, तर गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱ्या वाळू व चिरे वाहतूक करणाऱ्या गाड्याही रोखल्या जातील.” आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्री. परब म्हणाले, गोवा आणि सिंधुदुर्ग यांचे संबंध कायमच सलोख्याचे राहिले असून ते तसेच राहावेत, ही आमची भूमिका आहे. मात्र गोव्यातील असोसिएशनच्या मनमानीमुळे अनावश्यक वाद निर्माण झाले आहेत. चिरेखाण व्यावसायिकांना जीएसटी, वाढलेले डिझेल दर आणि इतर खर्चाचा मोठा भार सहन करावा लागत आहे. त्यामुळे भाववाढ अपरिहार्य ठरली आहे. तरीदेखील महाराष्ट्रातील गाड्या गोव्यात प्रवेश करू दिल्या जात नाहीत, विविध बंधने लादली जात आहेत. हा प्रकार अन्यायकारक असून याबाबत खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच या विषयावर सकारात्मक निर्णय होईपर्यंत तालुक्यातील सर्व ४० चिरेखाणींमधून गोव्याकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहील. जिल्ह्यातील इतर भागांकडे जाणाऱ्या गाड्याही आवश्यक असल्यास बंद ठेवण्याचा इशाराही त्यांनी दिला. आमदार निलेश राणे यांचीही लवकरच भेट घेऊन चिरेखाण व्यावसायिकांची बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गोव्यासोबत संघर्ष करण्याचा आमचा हेतू नाही. उलट गोव्याला चिरे, खडी आणि वाळूचा मोठा पुरवठा सिंधुदुर्गातूनच केला जातो. मात्र, योग्य भाव आणि सन्मान मिळत नसेल, तर हा व्यवसाय टिकविणे शक्य नाही, असेही श्री. परब यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, सावंतवाडी तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर जांभा दगड घरकुल बांधकामासाठी तसेच गोवा राज्यात विक्रीसाठी पाठवला जातो. मात्र मागील दोन वर्षांपासून पेडणे-बार्देश ट्रक ओनर्स असोसिएशनकडून महाराष्ट्रातील वाहनधारक व चिरेखाण व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणावर पिळवणूक सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. सर्व मालवाहू वाहनांना असोसिएशनचा लोगो लावण्याची सक्ती, गाड्या अडवून आरटीओ, पोलीस आणि माईन्स विभागामार्फत जाणीवपूर्वक कारवाई, गोवा चेकपोस्टवर तासन्तास गाड्या अडवून ठेवणे, माल रिकामा करून घेणे आणि चालकांना धमकावणे, असे प्रकार सातत्याने घडत असल्याचा आरोप व्यावसायिकांनी केला.
यामुळे गोव्यात जाणारी महाराष्ट्रातील वाहतूक जवळपास ठप्प झाली असून सावंतवाडीतील चिरेखाण उद्योग पूर्णपणे कोलमडला आहे. एकीकडे गोवा असोसिएशनचा जाच, तर दुसरीकडे शासकीय विभागांच्या जाचक अटींमुळे चिरेखाण व्यवसायिकांची दुहेरी कोंडी झाली आहे. या व्यवसायावर अवलंबून असलेल्या शेकडो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून, गोवा असोसिएशनच्या मनमानीला आळा घालून प्रशासकीय स्तरावरील अडथळे दूर करावेत, अशी जोरदार मागणी चिरेखाण व्यावसायिकांनी केली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, चिरेखाण व्यावसायिक संघाचे प्रकाश राऊत, अमित प्रभू, मदन सातोसकर, सुशिल कामटेकर, रंजन गावडे, प्रदीप मुळीक, दिगंबर कवठणकर, प्रविण बर्वे, गिरीश परब, राजेंद्र नाईक, गंगाराम मठकर, गिरीश परब, किरण मोरजकर, दिगंबर कवठणकर, अजित कवठणकर आदींसह तालुक्यातील मोठ्या संख्येने चिरेखाण व्यावसायिक उपस्थित होते.



