शिरशिंगे येथे नैसर्गिक शेतीची नवी क्रांती! ; तब्बल २० हजार लिटर ‘गोकृपामृतम’ निर्मितीचा संकल्प. ; सेंद्रिय शेतीकडे शिरशिंगेच्या शेतकऱ्यांची दमदार वाटचाल!

सावंतवाडी : महाराष्ट्र शासनाच्या डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजने अंतर्गत शिरशिंगे मळईवाडी येथील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे पाऊल टाकले आहे. येथील नोंदणीकृत ‘गोपी शेतकरी गट’ आणि ‘कलमेश्वर शेतकरी गट’ चालू खरीप हंगामामध्ये तब्बल २० हजार लिटर ‘गोकृपामृतम’ तयार करणार असून, त्याचा वापर स्वतःच्या शेतीत करणार आहेत. यामुळे परिसरात सेंद्रिय शेतीला मोठी गती मिळण्याची चिन्हे आहेत.

शिरशिंगे येथे आयोजित करण्यात आलेल्या एका विशेष कार्यक्रमात उप कृषी अधिकारी श्री. यशवंत सावंत यांनी शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. गोकृपामृतम हे शेतीसाठी अत्यंत प्रभावी आणि उपयुक्त असे जीवाणूसंवर्धक असून, यामध्ये १२० पेक्षा जास्त प्रकारचे शेतीला पूरक असणारे जीवाणू असतात, जे पिकाचे उत्पादन वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात, अशी माहिती सावंत यांनी यावेळी दिली. तसेच, त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष जागेवर हे गोकृपामृतम तयार करण्याचे प्रात्याक्षिकही करून घेतले.

या अभिनव उपक्रमासाठी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागाच्या वतीने आवश्यक ते सर्व साहित्य पुरवले जात आहे. सहाय्यक कृषी अधिकारी श्री. अक्षय खराडे यांनी सांगितले की, डॉ. पं.दे. नैसर्गिक शेती मिशन योजने अंतर्गत दोन्ही शेतकरी गटांना गोकृपामृतम तयार करण्यासाठी लागणारे प्लास्टिक ड्रम, कल्चर आणि इतर अनुषंगिक साहित्य कृषी विभागामार्फत उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे गटांतर्गत सर्व सदस्यांनी याचा प्रयोग स्वतःच्या शेतीत करावा आणि आपले उत्पादन वाढवावे, असे आवाहन त्यांनी केले.

कृषी विभागाकडून मिळत असलेल्या या उत्तम सहकार्याबद्दल प्रगतशील शेतकरी श्री. संदीप राऊळ यांनी समाधान व्यक्त करत विभागाचे आभार मानले. येथील शेतकरी ही गोकृपामृतमची संकल्पना शंभर टक्के यशस्वीपणे राबवतील, अशी ग्वाही त्यांनी आपल्या मनोगतातून दिली. या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्या सौ. नमिता राऊळ, शेतकरी गटांचे अध्यक्ष श्री. वासुदेव राऊळ, श्री. वामन राऊळ यांच्यासह परिसरातील महिला व पुरुष शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]
- Advertisement -spot_img

Latest Articles