बंगळुरू : बांगलादेशविरुद्ध शेर असणारे भारतीय खेळाडू न्यूझीलंडसमोर 46 धावांत ढेर झाले. न्यूझीलंडविरुद्धच्या बंगळुरू कसोटीत भारतीय क्रिकेट संघ सरेंडरच्या मूडमध्ये असल्याचे दिसून आले. पहिल्या दिवसाचा खेळ रद्द झाल्यानंतर चाहत्यांना टीम इंडियाकडून दमदार फलंदाजीची अपेक्षा होती, पण दुसऱ्या दिवशी पहिल्या-दोन सत्रात जे काही घडले, ज्यामुळे बंगळुरू कसोटीत टीम इंडियाने घरच्या मैदानावर सर्वात कमी धावसंख्या उभारली. टीम इंडियाने पहिल्या डावात केवळ 46 धावा केल्या होत्या.
बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. जो एकदम चुकीचा असल्याचे सिद्ध झाले. न्यूझीलंडच्या धोकादायक गोलंदाजीसमोर टीम इंडियाची टॉप ऑर्डर कोलमडताना दिसली. टीम इंडियाची परिस्थिती इतकी खराब होती की दोनच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले, तर अर्धा संघ खातेही उघडू शकले नाही. संघाकडून सर्वात जास्त ऋषभ पंतने 20 धावा केल्या.
अर्धा संघ शून्यावर बाद –
बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 2-0 ने जिंकल्यानंतर भारतासमोर आता न्यूझीलंडचे कडवे आव्हान आहे. बेंगळुरू कसोटीच्या दुसऱ्या दिवशी किवी गोलंदाजांची धोकादायक गोलंदाजी पाहायला मिळाली. विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांना दुसऱ्या दिवशी खातेही उघडता आले नाही. उपाहारानंतर फलंदाजीला आलेला आर अश्विनही जास्त वेळ क्रीजवर राहू शकला नाही आणि खातेही न उघडता बाद झाला.
टीम इंडियाची सर्वात छोटी धावसंख्या –
ज्या चिन्नास्वामीच्या मैदानावर षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतो त्याच मैदानावर टीम इंडियाला धावा करणे कठीण झाले. 46 धावा ही टीम इंडियाची मायदेशातील सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी 1979 मध्ये भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध 75 धावांत गारद झाला होता. कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाची ही तिसरी सर्वात कमी धावसंख्या आहे. 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला 36 धावांत गुंडाळले होते.