सावंतवाडी : सावंतवाडी शहरातील महत्त्वाच्या प्रकरणात नगर परिषदेच्या कारवाईला न्यायालयाने अंतरिम ब्रेक दिला आहे. मायकल डिसोझा यांच्या कंपनीला सावंतवाडी न्यायालयाने मोठा दिलासा देत नगर परिषदेने बजावलेल्या नोटीसेच्या अंमलबजावणीस स्थगिती दिली आहे.
या प्रकरणाची सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने पुढील आदेश होईपर्यंत संबंधित जागेवर “जैसे थे” (Status Quo) स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे नगर परिषदेला या प्रकरणात तातडीने कोणतीही पुढील कारवाई करता येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
या न्यायालयीन निर्णयामुळे मायकल डिसोझा यांच्या कंपनीला तात्पुरता दिलासा मिळाला असून, नगर परिषदेच्या कारवाईवर न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिल्याने या प्रकरणाची शहरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, आता या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले असून, न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच या वादाची पुढील दिशा स्पष्ट होणार आहे.



