अंतःकरणाचा ठाव घेणारी तीच खरीखुरी कविता! ; वेंगुर्ल्यातील ‘रंग उगवतीचे’ कविसंमेलनात ज्येष्ठ कवी शशिकांत तिरोडकर यांचे प्रतिपादन. ; दिग्गज कवींच्या काव्यरंगांनी रंगली मैफल.

वेंगुर्ला: “ज्या रचनेमध्ये शब्दांचा श्वासोश्वास जाणवतो, तीच खरीखुरी कविता असते. कविता हा बैठक मांडून, ठरवून लिहिण्याचा प्रकार नाही, तर आपण बेसावध असताना आंतरिक शक्तीने जी स्फुरते, तीच कविता थेट अंतःकरणाला स्पर्श करते,” असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी शशिकांत तिरोडकर यांनी येथे केले. आनंदयात्री वाङ्मय मंडळाने वेंगुर्ले कॅम्प येथील बॅरिस्टर नाथ पै समुदाय केंद्रात आयोजित केलेल्या ‘रंग उगवतीचे’ या भव्य कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.

या प्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्राचे ज्येष्ठ प्रसिद्ध कवी ऍड. विलास कवळेकर, आनंदयात्री वाङ्मय मंडळाच्या अध्यक्षा वृंदा कांबळी, वास्को येथील संगीत संशोधक शलती काळे आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सुधाकर ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते. कवी संमेलनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने अतिशय उत्साहात झाला.

कवितेच्या सामर्थ्यावर बोलताना तिरोडकर पुढे म्हणाले, “प्रचलित साहित्य प्रकारांपेक्षा कविता हा प्रकार अत्यंत वेगळा आणि परिणामकारक आहे. एखादी दहा-पंधरा ओळींची कवितासुद्धा समाजात क्रांतीची मशाल चेतविण्यास पुरेशी ठरते. मात्र, खरी कविता प्रयत्नांतून किंवा शब्दांची तोडफोड व जुळवाजुळव करून साधता येत नाही. अंतःमनातून जी रचना जन्माला येते, तीच अजरामर होते. जेव्हा कविता खऱ्या अर्थाने आपल्या हाताला लागते, तो क्षण कवीसाठी सर्वोच्च धन्यतेचा असतो.” असेही तिरोडकर म्हणाले.

ज्येष्ठ कवी ऍड. विलास कुवळेकर यांनी ‘वटपौर्णिमा’ आणि ‘श्वास’ या कविता सादर करत संमेलनाची सुरुवात दणक्यात केली. त्यानंतर विविध भागांतून आलेल्या कवींनी आपल्या बहारदार रचनांनी मैफल सजवली.
शिरोडा येथील कवी स्वप्नील वेंगुर्लेकर यांनी ‘थोडं माझं थोडं तुझं’ या कवितेतून पाऊस आणि वेंगुर्ल्याचे घट्ट, मुलायम नाते उलगडले. आदिती मसूरकर यांनी ‘येता पावसाची सर…’ मधून पावसाळी वातावरणाचा सुखद स्पर्श रसिकांना घडवला. वासुदेव पेडणेकर यांच्या ‘संवेदना’ कवितेतील वासराचे हंबरणे मनाला भिडले. सावंतवाडीचे योगेश कुलकर्णी यांची ‘मौनार्थ’, राजस्थानचे दिनेश बिष्णोयी यांची ‘मेरे दिल के तुकडे’ तसेच रामा पोलजी व मेधा मणेरीकर यांच्या आशयघन कवितांनी संमेलनाला प्रबोधनाची दिशा दिली.
कुडाळच्या प्रसाद खानोलकर यांच्या ‘पावसा तू येतस तेव्हा’ या कवितेसह राजेश वैद्य आणि प्राजक्ता आपटे यांनी पावसाच्या नाना तऱ्हा मांडल्या. तर कुडाळचे पशुवैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधाकर ठाकूर, सामंत मॅडम आणि डॉ. वसुधा मोरे यांनी शब्दांची पक्की बैठक असलेल्या दर्जेदार कविता सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला आनंदयात्रीच्या अध्यक्षा वृंदा कांबळी यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख करून दिली. सर्व मान्यवरांचे स्वागत अध्यक्षा वृंदा कांबळी, सचिव प्रा. डॉ. सचिन परूळकर, पदाधिकारी संजय पाटील, महेश राऊळ आणि विवेक तिरोडकर यांनी केले.
शिरोडा येथील प्रा. पांडुरंग कौलापुरे यांनी कविसंमेलनाचे अतिशय सुंदर निवेदन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र मातोंडकर यांनी केले, तर शेवटी प्रा. डॉ. सचिन परूळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या काव्यमय सोहळ्याला वेंगुर्ल्यातील रसिक आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles