चराठा गावठणवाडीत थरार!, अरुण परब यांच्या घरावर माड कोसळला! ; चिमुकल्यासह आई थोडक्यात बचावली!

सावंतवाडी : चराठा गावठणवाडी येथे मुसळधार पावसामुळे अरुण धोंडू परब यांच्या घरावर अचानक उंच माड कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत घराच्या छपरासह आतील साहित्याचे सुमारे १ लाख ४७ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे, घटना घडली त्यावेळी घरात सौ. दिप्ती अनिकेत परब आणि त्यांचा अडीच वर्षांचा मुलगा कु. अर्श परब उपस्थित होता. मात्र, दैव बलवत्तर असल्याने मायलेक थोडक्यात बचावले आणि मोठा अनर्थ टळला.

माड कोसळताना झालेल्या प्रचंड आवाजाने परिसरातील नागरिक धावत घटनास्थळी पोहोचले. घरात आई व चिमुकला सुरक्षित असल्याचे पाहताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

या दुर्घटनेत घराचे लोखंडी छप्पर पूर्णपणे नादुरुस्त झाले असून सिमेंटची पत्रे फुटली आहेत. तसेच घराच्या भिंतींना मोठ्या प्रमाणात तडे जाऊन त्या कमकुवत झाल्या आहेत. याशिवाय एका खोलीत ठेवलेले पेप्सी बनविण्याचे डीप फ्रीज व हार्डनर मशीनचा चक्काचूर झाला असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

घटनेची माहिती मिळताच तलाठी श्री. आव्हाड यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी माजी सरपंच बाळू वाळके, पोलिस पाटील सचिन परब, कोतवाल सुप्रिया परब यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

या घटनेमुळे चराठा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पावसाळ्यात धोकादायक अवस्थेतील माड व झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक ती उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles