माजी खासदारांच्या घरातच ‘अघोरी’चा थरार?, मुलासह ९ जणांवर गुन्हा दाखल. ; विवाहितेवर अमानुष छळाचा आरोप!, लग्नापूर्वी बंगला असल्याचे खोटे आश्वासन, भोंदू बाबांकडून जादूटोण्याचे प्रकार, पोलिसांत हाय-प्रोफाइल गुन्हा दाखल, कोकणातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ.

ठाणे/सिंधुदुर्ग : राज्याच्या राजकीय वर्तुळाला हादरा देणाऱ्या एका हाय-प्रोफाइल प्रकरणात माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलासह नऊ जणांविरोधात कापूरबावडी (ठाणे) पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लग्नापूर्वी स्वतःचा आलिशान बंगला असल्याचे खोटे सांगून फसवणूक करणे, पतीचे कथित नपुंसकत्व लपवण्यासाठी विवाहितेवर भोंदू बाबांच्या माध्यमातून अघोरी जादूटोणा करणे, तसेच शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केल्याचे गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. या प्रकरणामुळे संपूर्ण कोकणासह राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तक्रारदार गिरीजा गितेश राऊत यांनी दिलेल्या जबाबानुसार, ३ डिसेंबर २०१७ रोजी मुंबईतील वांद्रे येथे त्यांचा विवाह नगरसेवक गितेश विनायक राऊत यांच्याशी झाला. विवाह ठरविताना वाकोला येथे स्वतःचा बंगला आणि रुनवाल सिंफनीमध्ये आलिशान फ्लॅट असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, लग्नानंतर प्रत्यक्षात झोपडपट्टीतील घरात नेण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. याबाबत जाब विचारल्यावर धमकावण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
तक्रारीत पुढे म्हटले आहे की, लग्नानंतर पतीने सातत्याने शारीरिक संबंध ठेवण्यास टाळाटाळ केली. ऊटी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि स्वित्झर्लंडसारख्या ठिकाणी सहलीदरम्यानही जवळीक साधण्यास नकार देत विचारणा केल्यास मारहाण करण्यात आली.
तक्रारीनुसार, पतीचे कथित नपुंसकत्व लपवण्यासाठी विवाहितेवर “बाहेरची बाधा” असल्याचा बनाव करण्यात आला. त्यासाठी मुंबई, सावंतवाडी, राजापूर आणि कुडाळ येथील भोंदू बाबांकडे नेऊन लिंबू कापणे, काळ्या कणकेच्या बाहुल्या, टाचण्या टोचणे, अंगारे-धुपारे, जिवंत कोंबडा, केस उपटणे, तसेच गोमूत्र पिण्यास भाग पाडणे अशा अमानुष व अघोरी प्रकारांना सप्टेंबर २०१८ ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत सामोरे जावे लागल्याचा दावा करण्यात आला आहे.
याशिवाय मानसोपचार तज्ज्ञांनी सुचवलेल्या उपचारांकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलट, माजी खासदारांनी आपल्या राजकीय प्रभावाचा वापर करून डॉक्टरांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप तक्रारीत नमूद करण्यात आला आहे. नैसर्गिक गर्भधारणेचे पर्याय नाकारून घरच्या घरी “होम इन्सेमिनेशन” करण्यासाठी दबाव टाकणे, तसेच राजकीय कार्यक्रमांत अडथळा येऊ नये म्हणून मासिक पाळी पुढे ढकलणाऱ्या गोळ्या घेण्यास भाग पाडल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या जबाबाच्या आधारे पोलिसांनी पती गितेश विनायक राऊत, सासरे विनायक राऊत, सासू शामल राऊत, सुरेखा व राजेश सरफरे, आबा राऊत, फिरोज बाबा (कोलगाव, सावंतवाडी), काझी बाबा (करूड घाट, राजापूर) आणि हरिश्चंद्र घाडी (नानेली, कुडाळ) यांच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करत असून, तक्रारीतील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नाहीत. या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण कोकणासह राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles