सावंतवाडी : गुरूंप्रती कृतज्ञता आणि मातृसंस्थेबद्दलची आत्मीयता जपणारा एक प्रेरणादायी आदर्श कलंबिस्त इंग्लिश स्कूलमध्ये अनुभवायला मिळाला. शाळेचे माजी विद्यार्थी तथा लघु पाटबंधारे विभाग, ठाणे येथील सेवानिवृत्त शाखा अभियंता रमेश अर्जुन कदम यांनी आपल्या शिक्षणसंस्थेबद्दलची ऋणनिर्देशाची भावना व्यक्त करत प्रशालेला रोख एक लाख रुपयांची देणगी प्रदान केली. त्यांच्या या उदात्त दातृत्वाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
यावेळी प्रशालेच्या वतीने श्री. कदम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्यांनी आपल्या शैक्षणिक प्रवासाच्या आठवणींना उजाळा दिला.
“या शाळेचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. ग्रामीण भागात असूनही दर्जेदार शिक्षणाची संधी या संस्थेमुळे मिळाली. याच शाळेने माझ्या आयुष्याला दिशा दिली आणि आज मी जे काही आहे, त्याचे श्रेय या गुरूजनांना व संस्थेला जाते,” अशा भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
सन १९८७-८८ मध्ये दहावीच्या परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याचे सांगताना त्यांनी ड्रॉइंग ग्रेडच्या एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षांमध्ये मिळविलेल्या यशाचीही आठवण करून दिली. त्या गुणवत्तेच्या बळावर अनुरेखक (सिव्हिल ड्राफ्ट्समन) पदासाठी कोकण निवड मंडळाच्या भरती प्रक्रियेत यश मिळाले आणि १९९२ मध्ये ठाणे जिल्हा परिषदेत शासकीय सेवेत प्रवेश झाला. त्यानंतर स्थापत्य अभियंता म्हणून लघु पाटबंधारे विभागात कार्य करत शाखा अभियंता पदापर्यंतचा प्रवास पूर्ण करून तब्बल ३३ वर्षांची यशस्वी शासकीय सेवा बजावल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले.
आपल्या यशामागे प्रशालेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे सहकार्य आणि शाळेने दिलेले संस्कार यांचा सिंहाचा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासातच नव्हे तर कला, क्रीडा आणि विविध कौशल्यांमध्येही प्रावीण्य मिळवत सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकसित करावे, असा मौलिक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
ग्रामीण भागात असूनही कलंबिस्त हायस्कूल दर्जेदार, संस्कारक्षम आणि उपक्रमशील शिक्षण देणारी आदर्श शिक्षणसंस्था असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
श्री. कदम यांच्या या प्रेरणादायी दातृत्वाबद्दल संस्थाध्यक्ष शिवाजी सावंत, सचिव यशवंत राऊळ, सहसचिव चंद्रकांत राणे, सर्व संचालक मंडळ, मुख्याध्यापक अभिजीत जाधव, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले. त्यांच्या या उदात्त कृतीमुळे विद्यार्थ्यांसमोर “शाळेचे ऋण जपणारा आदर्श माजी विद्यार्थी” असा प्रेरणादायी संदेश उभा राहिला आहे.



