– संदीप चव्हाण.
म्हापण : शिक्षण हीच भविष्यातील खरी गुरुकिल्ली असल्याचा संदेश देत भाजप युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून बुधवारी केळूस पंचक्रोशीतील शेकडो विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले.
या उपक्रमांतर्गत केळूस फळये फोडा, केळूस कालवी बंदर, केळूस मोबार, केळूस खुडास येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसह नवभारत विद्यालय, केळूस आणि स. का. पाटील विद्यालय, केळूस येथील विद्यार्थ्यांना दप्तर, वह्या तसेच विविध शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळावी आणि प्रत्येक बालक आत्मविश्वासाने शिक्षणाचा प्रवास करावा, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. विद्यार्थ्यांच्या हातात ज्ञानाची ताकद देणे म्हणजे सक्षम, सशक्त आणि प्रगत भारताच्या निर्मितीत मोलाचा वाटा उचलणे, असा संदेशही या निमित्ताने देण्यात आला.

शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रमाला भाजप उपाध्यक्ष प्रसन्न उर्फ बाळू देसाई, साई नाईक, म्हापण ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा सदस्य गुरुनाथ मडवळ, केळूस ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश शेटये, उपसरपंच संजीव प्रभू, निकित राऊळ कोचरे, दत्ताराम कोनकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रुचिरा केळूसकर, सुषमा मसुरकर, महेश नागवेकर, मानवी कुडव, राजू पावसकर, मनोहर पावसकर, बाबुराव ताम्हणकर, नीलम कसालकर, विनोद कोचरेकर, अर्चना केळूसकर, आशा भगत, सुचिता केळूसकर, सुजिया वेंगुर्लेकर, केळूस हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रकाश खोत, उमेश चव्हाण, शालन पारकर, संभाजी तौर, शिवाजी काळे, नीलम राऊळ, रेश्मा गोसावी, प्रविणा दाभोलकर, सुंदर म्हापणकर, दिव्या खोत, तसेच अंगणवाडी सेविका राजकीर्ती केरकर, शांती साटम, मीनाक्षी साटम, अंजली केळूसकर, भक्ती केळूसकर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशाल परब यांच्या माध्यमातून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष लाभ होत असून, पालक व शिक्षकांकडून या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. विद्यार्थ्यांनीही आनंद व्यक्त करत अशा उपक्रमांमुळे शिक्षणासाठी नवे बळ मिळाल्याची भावना व्यक्त केली.



