अखेर ‘चेन स्नॅचर’ जेरबंद! ; कोल्हापूरच्या कळंबा कारागृहातून पोलिसांनी घेतले ताब्यात!

सावंतवाडी : पत्ता विचारण्याचा बहाणा करत महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून दुचाकीवरून क्षणार्धात पसार झालेल्या दोन सराईत चेन स्नॅचर्सना अखेर सावंतवाडी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा माग काढत पोलिसांनी थेट कोल्हापूरच्या कळंबा कारागृहापर्यंत धडक मारत दोघांना ताब्यात घेतल्याने या धाडसी तपासाची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

दिनांक १० जून २०२६ रोजी सकाळी सुमारे ८.३० वाजता कॉसमॉस पॅराडाईज इमारतीजवळ रंजना ठाकूर (वय ५९, व्यवसाय – गृहिणी) या जात असताना दोन अनोळखी इसमांनी पत्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यांनी क्षणार्धात त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून दुचाकीवरून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेनंतर तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांनी सीसीटीव्ही फुटेजसह तांत्रिक तपासाची चक्रे वेगाने फिरवत आरोपींचा माग काढला. तपासादरम्यान संबंधित आरोपींनी कोल्हापूर येथेही अशाच प्रकारचा चेन स्नॅचिंगचा गुन्हा केल्याचे उघड झाले. त्यानंतर कोल्हापूर पोलिसांशी समन्वय साधून १७ जुलै २०२६ रोजी कळंबा केंद्रीय कारागृहातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

त्यानंतर आरोपींना अटक करून आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून, या टोळीने इतर ठिकाणीही अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा कसून तपास सुरू आहे.

दरम्यान, या गुन्ह्याचा छडा लावून आरोपींना जेरबंद करणाऱ्या तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील यांच्या तपासकौशल्याचे फिर्यादी रंजना ठाकूर यांनी तोंडभरून कौतुक केले असून, सावंतवाडी पोलिसांच्या तत्पर कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles