मिलाग्रीस प्रशालेत ‘पालक दिन’ उत्साहात साजरा. ; विद्यार्थ्यांनी औक्षण करून व्यक्त केला कृतज्ञतेचा भाव!

सावंतवाडी : मिलाग्रीस प्रशालेमध्ये नुकताच ‘पालक दिन’ मोठ्या उत्साहात, आनंदी आणि भावनिक वातावरणात साजरा करण्यात आला. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांतून पालकांप्रती असलेला आदर, प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली.

या विशेष कार्यक्रमासाठी दीपक निगुडकर आणि दिपाली निगुडकर या आजी-आजोबांना प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानपूर्वक आमंत्रित करण्यात आले होते. त्यांच्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेतील विद्यार्थिनी नंदिनी राऊळ आणि सिया चव्हाण यांनी अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आणि नेटकेपणाने केले.

यावेळी पालकांच्या वतीने रोशनी गावडे यांनी मनोगत व्यक्त करत शाळेतील शैक्षणिक तसेच सांस्कृतिक उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षक घेत असलेल्या मेहनतीबद्दल त्यांनी प्रशालेचे अभिनंदन केले.

कार्यक्रमाला प्रशालेचे मुख्याध्यापक रेव्ह. फादर रिचर्ड सालदाना तसेच पर्यवेक्षिका संध्या टीचर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. विद्यार्थ्यांनी पालकांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि आपल्या भावना व्यक्त करत कृतज्ञतेचा अनोखा संदेश दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी शारदा गावडे टीचर यांनी प्रमुख पाहुणे, पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या सुंदर आणि संस्मरणीय आयोजनामुळे पालक, विद्यार्थी आणि शाळा प्रशासन यांच्यातील स्नेहबंध अधिक दृढ झाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles