सावंतवाडी : विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकता, व्यवसाय व्यवस्थापन, आर्थिक व्यवहारांचे ज्ञान तसेच स्थानिक उत्पादनांविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित राणी पार्वतीदेवी ज्युनिअर कॉलेज, सावंतवाडी येथे विद्यार्थ्यांच्या सहभागातून आयोजित करण्यात आलेला ‘आठवडा बाजार’ हा अभिनव उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

या उपक्रमात विद्यार्थ्यांनी स्वतः विविध स्टॉल्स उभारून करटोली, टाकळा, शेपू, पेवगा, अळंबी, अळू, बांबूचे कोंब, ताजे खेकडे, गावठी मसाले, गावठी अंडी, गावठी तांदूळ, दही, ताक, तांदळाचे लाडू, बेसन लाडू तसेच इतर पारंपरिक व स्थानिक उत्पादनांची आकर्षक मांडणी करून विक्री केली. विद्यार्थ्यांनी ग्राहकांचे स्वागत, उत्पादनांची माहिती, विक्री, हिशोब आणि आर्थिक व्यवहार यांचे नियोजन स्वतः सांभाळत उपक्रम यशस्वी केला. या माध्यमातून विद्यार्थ्यांना व्यवसायाचे प्राथमिक ज्ञान, ग्राहकांशी संवाद, संघभावना आणि स्वावलंबनाचे प्रत्यक्ष धडे मिळाले.
कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी व सुप्रसिद्ध नाट्यकलाकार सर्वेश मोरजकर याने साकारलेले ‘कांतारा’ हे पात्र. आपल्या प्रभावी अभिनयाने आणि दमदार सादरीकरणाने त्याने उपस्थितांची मने जिंकत कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढवली.
या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती संप्रवी कशाळीकर, प्रभारी प्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, प्रभारी उपप्राचार्य सविता माळगे, पर्यवेक्षक नामदेव मुठे, सांस्कृतिक विभाग प्रमुख माया नाईक, प्रा. संतोष पाथरवट, डॉ. संजना ओटवणेकर, डॉ. अजेय कामत, प्रा. रणजित राऊळ, प्रा. वामन ठाकूर, प्रा.वनिता घोरपडे प्रा. स्मिता खानोलकर, प्रा. विजया सावंत प्रा. दशरथ सांगळे, प्रा. केदार म्हसकर, प्रा. पवन वनवे, प्रा. स्पृहा टोपले, , प्रा. जोसेफ डिसिल्वा,प्रा. निलेश कळंगुटकर, प्रा. ज्योती सावंत, प्रा. पूनम वाडकर, प्रा. लीना कोळंबकर, प्रा.मोरजकर , प्रा.दीपा गवस, प्रा.गावडे प्रा.वेजरे, प्रा.गावकर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नागरिकांचा भरभरून प्रतिसाद यामुळे ‘आठवडा बाजार’ हा उपक्रम अत्यंत यशस्वी ठरला. स्थानिक उत्पादने, पारंपरिक खाद्यसंस्कृती आणि ग्रामीण जीवनशैलीचा परिचय करून देतानाच “चला… आपल्या गावाचा अभिमान जपूया, स्थानिक उत्पादने वापरूया!” हा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यात या उपक्रमाला यश आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा हा उपक्रम उपस्थितांच्या विशेष पसंतीस उतरला.



