विठ्ठलनामाच्या गजरात दुमदुमले दोडामार्ग इंग्लिश स्कूल. ; आषाढी एकादशीनिमित्त ‘अभंगवाणी’ने उधळला भक्तिरसाचा साज.

– साबाजी परब.

दोडामार्ग : आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडी संचलित दोडामार्ग इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, दोडामार्ग येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘अभंगवाणी’ या भक्तिमय सांस्कृतिक कार्यक्रमाने संपूर्ण विद्यालय परिसर विठ्ठलनामाच्या मंगल गजराने आणि भक्तिरसाच्या सुरेल स्वरांनी दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अभंग, वारकरी दिंडी आणि पारंपरिक नृत्याविष्कारांनी उपस्थितांना पंढरीच्या भक्तिमय वातावरणाचा अविस्मरणीय अनुभव दिला.

कार्यक्रमाची सुरुवात पारंपरिक वारकरी दिंडीने झाली. टाळ-मृदंगाच्या निनादात, भगव्या पताका आणि पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडीने वारकरी संप्रदायाची समृद्ध परंपरा आणि भक्तीभावाचे मनोहारी दर्शन घडविले. त्यानंतर इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव, एकनाथ यांच्या अभंगांचे भावपूर्ण सादरीकरण करत संपूर्ण वातावरण भक्तिमय केले. वारकरी नृत्याच्या मोहक सादरीकरणाने कार्यक्रमात रंगत आणत उपस्थितांची भरभरून दाद मिळवली.

यावेळी शाळेतील शिक्षक आनंद बामणीकर, तुळशीदास राऊळ तसेच कु. वैष्णवी कदम यांनीही आपल्या मधुर स्वरांत अभंग सादर करून कार्यक्रमाची आध्यात्मिक उंची अधिक वृद्धिंगत केली.

कार्यक्रमाला सुरेल संगीताची साथ कु. दक्षता बाबुराव घोगळे आणि कु. स्वानंदी महेंद्र मणेरीकर यांनी हार्मोनियमवर दिली. तबल्यावर कार्तिक अभंगओम गवस, तर पखवाजावर गणेश ताटे यांनी उत्कृष्ट साथसंगत करून प्रत्येक सादरीकरण अधिक प्रभावी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुळशीदास राऊळ यांनी ओघवत्या आणि प्रभावी शैलीत केले.

या भक्तिमय उपक्रमातून विद्यार्थ्यांना संत साहित्य, वारकरी संप्रदाय, भारतीय अध्यात्म आणि संस्कारमूल्यांची समृद्ध परंपरा जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. भक्ती, संस्कार, समता आणि सांस्कृतिक वारसा जपण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना लाभली.

कार्यक्रमाचे शिक्षण प्रसारक मंडळ, सावंतवाडीचे अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत, सर्व संचालक मंडळ, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी मनापासून कौतुक करत अशा संस्कारक्षम उपक्रमांचे स्वागत केले.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles