✍️रूपेश पाटील.

“गुरु गोविंद दोऊ खड़े, काके लागूँ पाय।
बलिहारी गुरु आपणे, गोविंद दियो बताय॥”
– संत कबीर.
वाचक मित्रहो, भारतीय संस्कृतीत गुरूला परमेश्वरापेक्षाही श्रेष्ठ स्थान दिले आहे. संत कबीरांनी या दोह्यात सांगितले आहे की, गुरु आणि गोविंद दोघे समोर उभे असतील, तर प्रथम गुरुंच्या चरणी नतमस्तक व्हावे; कारण परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवणारे गुरुच असतात. म्हणूनच गुरुपौर्णिमा हा केवळ उत्सव नसून कृतज्ञता, आत्मपरीक्षण आणि संस्कारांचा सोहळा आहे.
आई ही जीवनाची पहिली गुरू, वडील संघर्षाची शिकवण देणारे गुरू, शिक्षक ज्ञानाचे दाते, तर अनुभव, संकटे आणि समाज हेही आपल्या आयुष्यातील मौन गुरू असतात. प्रत्येक व्यक्ती आयुष्याच्या वाटेवर काही ना काही शिकवून जाते. म्हणूनच गुरुपौर्णिमा म्हणजे प्रत्येक ज्ञात-अज्ञात गुरुंना वंदन करण्याचा दिवस.
महाभारतातील एका प्रसंगात भगवान श्रीकृष्ण चार पांडवांना कलियुगाचे चित्र दाखवतात. अर्जुनाला मधुर स्वरात गाणारी, पण जिवंत सशाचे मांस भक्षण करणारी कोकिळा दिसते. श्रीकृष्ण सांगतात की, कलियुगात अनेक जण ज्ञानाचा आव आणतील, मधुर बोलतील; पण प्रत्येकजण खरा गुरु असेलच असे नाही. म्हणून श्रद्धेबरोबर विवेकही आवश्यक आहे.

“जाका गुरु है अंधला, चेला खरा निरंध।
अंधे अंधा ठेलिया, दोनों कूप पड़ंत॥”
– संत कबीर.
या दोह्यातून संत कबीर स्पष्ट करतात की, अज्ञानी गुरु आणि विवेकशून्य शिष्य दोघांचाही शेवट अधःपतनात होतो. त्यामुळे गुरुची निवड ही विचारपूर्वक आणि सत्याच्या कसोटीवर केली पाहिजे.
भीमाला भरलेल्या चार विहिरी आणि मधोमध कोरडी विहीर दिसते. हा प्रसंग श्रीमंती आणि गरिबीतील वाढती दरी दाखवतो. समाजात संपत्तीचा साठा असूनही गरजूंना मदतीचा हात पुढे केला जात नाही. गुरूंची खरी शिकवण मात्र दया, दान आणि सेवाभावाची आहे.
नकुलाला वासरावर अति प्रेम करणारी गाय दिसते. प्रेम आवश्यक आहे; पण अति प्रेमही नुकसानकारक ठरू शकते. मुलांना संस्कार, स्वावलंबन आणि जबाबदारी शिकवणे हेच खरे पालकत्व आहे.
सहदेवाला डोंगरावरून कोसळणारी प्रचंड शिळा एका छोट्याशा रोपामुळे थांबलेली दिसते. श्रीकृष्ण सांगतात की, कलियुगात चारित्र्याची घसरण होईल; पण ईश्वराचे नामस्मरण, सत्संग आणि सदाचार हीच माणसाला वाचवणारी शक्ती असेल.
“गुरु कुम्हार शिष्य कुंभ है, गढ़ि गढ़ि काढे खोट।
अंतर हाथ सहार दे, बाहर मारे चोट॥”
– संत कबीर
कुंभार जसा मडक्याला बाहेरून आकार देताना आतून आधार देतो, त्याचप्रमाणे खरा गुरु शिष्याच्या व्यक्तिमत्त्वातील दोष दूर करताना त्याला योग्य दिशा आणि आधार देत असतो. गुरूंचे कठोर वाटणारे शब्दही शेवटी शिष्याच्या हितासाठीच असतात.
आजच्या माहितीच्या महासागरात ज्ञान सहज उपलब्ध आहे; परंतु विवेक, चारित्र्य, मूल्ये आणि जीवनदृष्टी देणारा गुरु मिळणे हेच खरे भाग्य आहे. गुरुपौर्णिमा आपल्याला सांगते की, गुरु हा केवळ धडा शिकवणारा शिक्षक नसून अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ आहे.
या गुरुपौर्णिमेला आपण चार संकल्प करूया! – योग्य गुरुची विवेकाने निवड करूया, गरजूंना मदतीचा हात देऊया, प्रेमात संयम राखूया आणि चारित्र्य जपत ईश्वरनामाचा आधार घेऊया. कारण गुरु म्हणजे केवळ व्यक्ती नव्हे; तो जीवनाला योग्य दिशा देणारा प्रकाश आहे.
“गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा,
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य,
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती,
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य,
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रामाणिकतेचे मूर्तिमंत प्रतिक”.
आपणा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा !
✍️रूपेश पाटील.
(महाराष्ट्र शासनाचा राज्य युवा पुरस्कार विजेते वक्ते तथा मुख्यमंत्री महामित्र पुरस्कार विजेता.)




