तब्बल ६ वर्षांनंतर सावंतवाडीत राजधानी एक्स्प्रेसचे पुनरागमन! ; प्रवासी संघटनेकडून जल्लोषात झाले स्वागत!

सावंतवाडी : सावंतवाडी रोड (लोकनेते मधू दंडवते टर्मिनस) रेल्वे स्थानकाला पुन्हा एकदा राजधानी एक्स्प्रेसचा थांबा मिळाल्यानंतर बुधवारी या गाडीचे प्रथमच जल्लोषात स्वागत करण्यात आले. कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीने रेल्वेचे पूजन, पुष्पहार अर्पण, चालकांचा सत्कार आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सकाळी सुमारे ९.३० वाजता राजधानी एक्स्प्रेस सावंतवाडी स्थानकात दाखल होताच उपस्थित प्रवासी, रेल्वेप्रेमी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले. रेल्वेचे पूजन करून गाडीच्या दोन्ही चालकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी सांगितले की, कोरोनाकाळात राजधानी एक्स्प्रेस आणि गरीबरथ एक्स्प्रेसचा थांबा बंद करण्यात आला होता. संघटनेने सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे राजधानी एक्स्प्रेस, गरीबरथ एक्स्प्रेस तसेच मंगळूरू एक्स्प्रेसचा थांबा पुन्हा मिळविण्यात यश आले. या यशासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.

सावंतवाडी रेल्वे स्थानकाला लोकनेते मधू दंडवते टर्मिनस हे नाव देण्यात आले असून, त्या नावाला साजेसे प्रवासी सुविधा व विकासकामे भविष्यात येथे व्हावीत, अशी अपेक्षाही मठकर यांनी व्यक्त केली.

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष सागर तळवडेकर, ज्येष्ठ सल्लागार सुभाष शिरसाट, खजिनदार भूषण बांदिवडेकर, सिद्धेश सावंत, मिहीर गावडे, यश सावंत, संकेत सावंत, सरिता सावंत, प्रेरणा पोकळे, निधी धुरी, करण धुरी, श्री. तानावडे, मळगाव रिक्षा संघटनेचे पदाधिकारी तसेच कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि रेल्वेप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles