कोमसाप मालवणचा ‘नमन नटवरा’ रंगला! ; विविध कलाविष्कारांनी आचरेकर रसिकांची जिंकली मने.

– संगीत रंगभूमीचे ज्येष्ठ गायक-अभिनेते पं. प्रसाद सावकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

आचरे : कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) मालवणच्या कलाकारांनी सादर केलेला ‘नमन नटवरा’ हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम आचरे येथील मातोश्री मंगल कार्यालयाच्या रंगमंचावर उत्साहात आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला. विविध कलाविष्कार, विनोदी प्रहसन, नाट्यछटा, मालवणी गीत, कथ्थक नृत्य, एकपात्री प्रयोग आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रात्यक्षिकांनी कार्यक्रमाला रंगत आणली.

कार्यक्रमाला कोमसाप जिल्हा समन्वयक रुजारीओ पिंटो, माजी उपशिक्षणाधिकारी सिंधुदुर्ग रामचंद्र आंगणे आणि माजी गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती मालवण दत्तात्रय मुळीक यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी कोमसाप मालवणचे अध्यक्ष सुरेश शामराव ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संगीत रंगभूमीचे ज्येष्ठ गायक-अभिनेते पं. प्रसाद सावकार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी सुरेश ठाकूर यांनी पं. प्रसाद सावकार यांच्या कला क्षेत्रातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संगीत रंगभूमीला वाहून घेतले. ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकातील ‘जय गंगे भागीरथी’ या गीताने त्यांनी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला. संगीत संशयकल्लोळ, कट्यार काळजात घुसली, संगीत होनाजी बाळा, मंदारमाला यांसह अनेक नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनय आणि गायनाची अमिट छाप रसिकांच्या मनावर उमटवली. वयाच्या ९८व्या वर्षापर्यंत त्यांनी रसिकांचे मनोरंजन केले. ‘नमन नटवरा’ हा कार्यक्रम त्यांच्या पवित्र स्मृतीस अर्पण करून त्यांना भावांजली वाहण्यात येत आहे, असे ठाकूर यांनी सांगितले.

यानंतर ‘जय जय गौरीशंकर’ मधील विद्याधर गोखले लिखित ‘सप्तसूर झंकारीत बोले’ ही नांदी सादर करून विद्याधर गोखले यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यानंतर कोमसाप मालवणच्या कलाकारांनी विविध कलाविष्कार सादर करून कार्यक्रमात रंगत आणली. ‘इतिहासाचा तास’ या विनोदी प्रहसनातून कुमार कांबळे व सुनंदा कांबळे यांनी हास्याची पेरणी केली. प्राजक्ता खोत यांनी नाट्यछटेतून प्रभावी संवाद सादर केला. ‘कहाणी म्हणींची’ या सुसंवादातून चंद्रशेखर धानजी व उज्वला धानजी यांनी रसिकांचे मनोरंजन केले.

‘मोलकरणीचा यशस्वी प्रवास’ या मुलाखतीतून मधुरा माणगावकर व रसिका तेंडोलकर यांनी सामाजिक आशय मांडला. त्रिंबक आजगावकर यांनी ‘भिंगरो कोंबडो’ या मालवणी गीतावर सादर केलेल्या नृत्याला दाद मिळाली. शरयू घाडी यांनी कथ्थक नृत्य व श्रावण गीतावरील नृत्य सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

विशेष आकर्षण ठरलेल्या ‘बुवाबाजी एक फसवेगिरी’ या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या प्रात्यक्षिकातून विजय चौकेकर व त्यांचे सहकारी संजय परब, सायली परब, श्रुती गोगटे, मनाली फाटक आणि योगेश मुणगेकर यांनी अंधश्रद्धेविरोधात प्रभावी संदेश दिला.

मंदार सांबारी यांनी ‘मत्स्यगंधा’ नाटकातील देवव्रतची भूमिका साकारत एकपात्री प्रयोगातून अभिनयाची ताकद दाखवली, तर विनोद कदम यांनी दशावतारातील पातळकेतूची भूमिका साकारून रसिकांची वाहवा मिळवली.

या संपूर्ण कार्यक्रमाची निर्मिती कोमसाप मालवणचे नाट्य विभाग प्रमुख सुरेंद्र सकपाळ यांनी केली. त्यांना रमाकांत शेटये व महादेव बागडे यांचे सहकार्य लाभले.

कार्यक्रमाला कोमसाप तसेच कथामाला मालवणचे बहुसंख्य कार्यकर्ते आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्य, संगीत, नाट्य आणि लोककलेचा सुरेख संगम घडविणाऱ्या ‘नमन नटवरा’ने आचरेच्या रंगमंचावर अविस्मरणीय सांस्कृतिक मैफल रंगवली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles