सावंतवाडी : राष्ट्रीय महामार्ग पोलीस विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यावरील उपस्थिती, नियुक्ती तसेच रजा नोंदीबाबतची माहिती माहितीच्या अधिकारातून मागविण्यात आली आहे. सावंतवाडी येथील माहिती अधिकार पदाधिकारी सुशिल चौगुले यांनी राष्ट्रीय महामार्ग पोलीस, सदर विभागाच्या जनमाहिती अधिकाऱ्यांकडे याबाबत अर्ज दाखल केला आहे.
माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत दाखल केलेल्या या अर्जात २३ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ०५ :२१ वाजता ते हॉटेल आराध्या दरम्यान कर्तव्य बजावण्यासाठी हजर असलेल्या सर्व पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवा पुस्तिकेतील प्रमाणित माहिती मागविण्यात आली आहे.
यामध्ये संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांची महामार्ग पोलिस विभागात नियुक्ती झाल्यापासून आजपर्यंत कोणत्याही स्वरूपाची रजा घेतली असल्यास त्याची तपशीलवार नोंद, तसेच रजा मंजुरीसंदर्भातील नोंदींच्या प्रमाणित प्रती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय संबंधित पोलिस कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावताना शासकीय वाहन अथवा वैयक्तिक वाहन वापरण्याची परवानगी आहे का, याबाबतची विभागाकडील तरतूद व संबंधित नोंदीही मागविण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय महामार्ग सुरक्षेसाठी नेमणूक असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना महामार्ग पोलिस म्हणून वाहनांवर कारवाई करण्याचा अधिकार कोणत्या शासन तरतुदीनुसार आहे, याची प्रमाणित प्रत देण्याची मागणीही अर्जात करण्यात आली आहे.
तसेच राष्ट्रीय महामार्ग सुरक्षा मदत केंद्र, असरोली टोलनाका कार्यालयातील सद्यस्थितीतील कार्यालय प्रमुख म्हणून पदभार असलेल्या अधिकाऱ्याचे नाव, पदनाम, हुद्दा व संबंधित माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
अर्जदाराने ही माहिती २३ जुलै २०२६ पासून अर्ज प्राप्त होईपर्यंतच्या कालावधीशी संबंधित असल्याचे नमूद केले आहे. अर्ज २७ जुलै २०२६ रोजी सावंतवाडी येथे दाखल करण्यात आला असून, माहितीच्या अधिकारांतर्गत निर्धारित मुदतीत माहिती देण्याची मागणी करण्यात आली आहे.
या अर्जामुळे राष्ट्रीय महामार्ग पोलिसांच्या कर्तव्यावरील उपस्थिती, नियुक्ती आणि प्रशासकीय नोंदींबाबतची माहिती सार्वजनिक होण्याची शक्यता असून, संबंधित विभागाकडून काय माहिती दिली जाते याकडे लक्ष लागले आहे.



