मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था चव्हाट्यावर!, वेत्येत खड्डे अन् झाडीचा विळखा! ; रस्ता दुरुस्ती व साफसफाईसाठी सरपंच गुणाजी गावडे यांचा महामार्ग विभागाला इशारा!

सावंतवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ च्या वेत्ये परिसरातील दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे, दुतर्फा वाढलेली झाडी आणि त्यामुळे निर्माण झालेला अपघाताचा धोका लक्षात घेता रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून रस्त्यालगतची झाडी साफ करण्यात यावी, अशी मागणी वेत्ये ग्रामपंचायतीने केली आहे.

यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग उपविभाग क्रमांक ३, सावंतवाडीच्या उपअभियंत्यांना निवेदन देण्यात आले आहे. रस्त्याच्या दुरवस्थेकडे तातडीने लक्ष न दिल्यास मोठा अपघात घडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी, अशी भूमिका ग्रामपंचायतीने घेतली आहे.

वेत्ये ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मुख्य सर्कल ते नेमळे-मळगाव-वेत्ये-सोनुर्ली रस्ता तसेच बायपास रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना वाहन चालविताना मोठी कसरत करावी लागत असून, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी परिस्थिती धोकादायक बनली आहे.

⚠️ वाढलेल्या झाडीमुळे धोका आणखी वाढला!

रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचा कड आणि वळणांचा अंदाज वाहनचालकांना येत नसल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. त्यामुळे संभाव्य जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी रस्त्याची तातडीने डागडुजी करण्यासोबतच दुतर्फा वाढलेली झाडी हटविणे गरजेचे असल्याचे ग्रामपंचायतीने निवेदनात स्पष्ट केले आहे.

🛣️ “अपघाताची वाट पाहू नका; तातडीने कार्यवाही करा!”

महामार्गावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीस सुरक्षित करावा, तसेच रस्त्यालगतची झाडी आणि वाढलेले गवत तातडीने हटवावे, अशी ठाम मागणी करण्यात आली आहे. अपघात घडल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी त्यापूर्वीच प्रशासनाने प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे.

या मागणीसाठी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, ग्रामपंचायत सदस्य राजन आंबेकर आणि सुशील कोकुळकर यांनी संबंधित विभागाकडे निवेदन साद केले.

महामार्ग विभाग आता या निवेदनाची कितपत गांभीर्याने दखल घेतो आणि वेत्ये परिसरातील धोकादायक खड्डे व वाढलेल्या झाडीवर कधी कार्यवाही करतो, याकडे ग्रामस्थांसह वाहनचालकांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles