सावंतवाडी : सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे राज्य युवा नेते विशाल परब यांनी त्यांची सदिच्छा भेट घेत पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, भाजपा जिल्हा सरचिटणीस मनोज नाईक आणि माजी नगरसेवक राजू बेग यांनीही पुष्पगुच्छ देत नूतन पोलीस निरीक्षकांचे स्वागत केले.
सावंतवाडी शहरासह संपूर्ण तालुक्यात कायदा आणि सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखत नागरिकांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी पोलीस प्रशासन आणि नागरिकांमध्ये समन्वय असणे गरजेचे असल्याचे यावेळी चर्चा करण्यात आली. शहरातील विविध प्रश्न, नागरिकांची सुरक्षितता आणि आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त याबाबतही यावेळी चर्चा झाली.
गणेशोत्सवासाठी पोलीस प्रशासन सज्ज!
येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी शहर आणि तालुक्यात मोठ्या उत्साहाचे वातावरण असणार आहे. या काळात वाहतूक व्यवस्था, गर्दीचे नियोजन, कायदा-सुव्यवस्था आणि सुरक्षितता यांना विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे.
गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि कोणताही अनुचित प्रकार न घडता पार पडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील. कायदेशीर खबरदारी घेत गणेशोत्सव काळात पोलीस प्रशासन आपली जबाबदारी सक्षमपणे पार पाडेल, अशी ग्वाही पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी दिली.
नूतन पोलीस निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडीतील कायदा-सुव्यवस्था आणखी मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त करत विशाल परब यांनी त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी विनेश तावडे, केतन आजगावकर, विकास परब, ओंकार पावस्कर आदी उपस्थित होते.



