डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकासाठी बौद्ध महासभा आक्रमक! ; स्वातंत्र्यदिनी सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा!

✍️ मोहन जाधव.

सावंतवाडी (प्रतिनिधी) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक सावंतवाडी भेटीच्या स्मृती जपण्यासाठी स्मारक उभारण्याचा संकल्प केलेल्या भारतीय बौद्ध महासभा, शाखा सावंतवाडीने आता नगरपरिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. स्मारकासाठी खरेदी केलेल्या जागेकडे जाण्या-येण्याचा मार्ग बहुउद्देशीय सभागृहाच्या बांधकामामुळे बंद झाल्याचा आरोप करत, येत्या स्वातंत्र्यदिनी सावंतवाडी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा महासभेने दिला आहे.

यासंदर्भात भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने २१ जुलै रोजी नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २२ ऑक्टोबर १९३२ रोजी न्यायालयीन कामानिमित्त सावंतवाडी संस्थानला भेट दिली होती. तत्कालीन सावंतवाडी संस्थानचे राजे खेम सावंत भोसले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची झालेली ही दुर्मिळ भेट इतिहासात अजरामर ठरली आहे.

याच भेटीदरम्यान डॉ. आंबेडकर यांनी राजापूर ते गोवा परिसरातील कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा सावंतवाडीत घेतल्याचा उल्लेखही निवेदनात करण्यात आला आहे. या ऐतिहासिक भेटीला उजाळा देण्यासाठी नगरपालिकेने संबंधित ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यान उभारले, ही कौतुकास्पद बाब असल्याचे महासभेने म्हटले आहे.

२००४ मध्ये स्मारकासाठी जमीन खरेदी

या ऐतिहासिक आठवणी जतन करण्याच्या उद्देशाने भारतीय बौद्ध महासभेने समाज मंदिर परिसरात सुमारे ३.५२ गुंठे बिनशेती जमीन सन २००४ मध्ये खरेदी केली. या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचा संकल्प करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर नगरपरिषदेने या जागेसमोर बहुउद्देशीय सभागृहाची इमारत उभारल्याने स्मारकाच्या जागेकडे जाण्या-येण्याचा मार्ग बंद झाल्याचे महासभेचे म्हणणे आहे.

सभागृहाचे बांधकाम सुरू असताना समाजाच्या वतीने विरोध करण्यात आला होता. त्यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष व प्रशासनाने इमारतीच्या उजव्या बाजूने ये-जा करण्यासाठी जागा सोडून तेथे मार्ग उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे.

परवानगीसाठी पाठपुरावा; चार महिने उलटूनही कार्यवाही नाही

स्मारक उभारण्यासाठी महासभेने नगरपरिषदेकडे अनेक वेळा प्रस्ताव सादर केले. त्यानुसार गेल्या वर्षी आवश्यक शुल्कही भरून घेण्यात आले. मात्र, परवानगीच्या प्रस्तावाचे पुढे काय झाले, याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतीही लेखी माहिती देण्यात आलेली नसल्याचे महासभेने म्हटले आहे.

या प्रश्नाबाबत विद्यमान नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन समस्या मांडण्यात आली होती. त्यावेळी १५ दिवसांत कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, चार महिने उलटूनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याचा आरोप महासभेने केला आहे.

त्यामुळे आता तालुक्यातील सर्व बौद्ध बांधव लोकशाही व सनदशीर मार्गाने येत्या स्वातंत्र्यदिनी नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा भारतीय बौद्ध महासभेने निवेदनाद्वारे दिला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles