सावंतवाडी : मुक्ताई ॲकेडमीतर्फे सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै. सूर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित करण्यात आलेल्या कॅरम स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सावंतवाडी शहर मर्यादित आयोजित या स्पर्धेत शहरातील १० शाळांमधील पहिली ते दहावीच्या एकूण ७१ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
कोरोना कालावधीनंतर मुक्ताई ॲकेडमीने प्रथमच सावंतवाडीत विद्यार्थ्यांसाठी अशा मोठ्या कॅरम स्पर्धेचे आयोजन केले. पाटणकर वाडा येथील ॲकेडमीच्या कॅरम प्रशिक्षण केंद्रात ही स्पर्धा पार पडली. विद्यार्थ्यांना कॅरमसारख्या खेळाची गोडी लागावी आणि त्यांच्यातील क्रीडागुणांना व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेला उपस्थित पालकांनीही या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले.
स्पर्धेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा कॅरम असोसिएशनचे माजी पदाधिकारी तथा ज्येष्ठ कॅरमप्रेमी नरेंद्र मसुरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर, सरचिटणीस स्नेहा पेडणेकर, राष्ट्रीय बुद्धिबळपटू बाळकृष्ण पेडणेकर तसेच विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना नरेंद्र मसुरकर यांनी मुक्ताई ॲकेडमी गेल्या दहा वर्षांपासून विद्यार्थ्यांसाठी कॅरम व बुद्धिबळ या खेळांच्या माध्यमातून राबवत असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ कॅरम प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांचे मार्गदर्शन घेऊन आपल्या खेळात प्रगती करावी, असे आवाहन त्यांनी केले. आई-वडिलांबरोबरच जीवनात गुरूचे स्थानही अत्यंत महत्त्वाचे असते, असे त्यांनी नमूद केले.
मुक्ताई ॲकेडमीतर्फे कौस्तुभ पेडणेकर हे विद्यार्थ्यांना कॅरम व बुद्धिबळाचे प्रशिक्षण देत असून, वेळोवेळी विविध स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी देत आहेत. हा उपक्रम निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मसुरकर यांनी सांगितले.
यावेळी नरेंद्र मसुरकर आणि बाळकृष्ण पेडणेकर यांनी कॅरम बोर्डवर प्रत्यक्ष खेळ खेळून स्पर्धेचे उद्घाटन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सौ. स्नेहा पेडणेकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.



