‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ११ ऑगस्टला देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा! ; भाजपा राज्य युवानेते विशाल परब यांचा स्तुत्य उपक्रम.

सावंतवाडी : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, शिस्त, सांघिक भावना आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक व्हावी, तसेच देशभक्तीची भावना अधिक दृढ व्हावी, या उद्देशाने ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत सावंतवाडी विधानसभा भाजपा व महाराष्ट्र भाजपा राज्य युवानेते विशाल परब यांच्या वतीने सावंतवाडी तालुक्यातील हायस्कूल विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता श्री. जगन्नाथराव भोसले उद्यान, सावंतवाडी येथे होणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील सर्व हायस्कूलमधील विद्यार्थी संघांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.

“विद्यार्थ्यांच्या कंठातून राष्ट्रभक्ती, राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश जनमानसापर्यंत पोहोचावा, यासाठी सावंतवाडी तालुक्यातील सर्व हायस्कूलनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा,” असे आवाहन भाजपा राज्य युवानेते विशाल परब यांनी केले आहे.

विजेत्यांवर रोख पारितोषिकांची बरसात –

स्पर्धेतील विजेत्या संघांसाठी आकर्षक रोख पारितोषिके जाहीर करण्यात आली आहेत. प्रथम क्रमांकासाठी ₹७,०००, द्वितीय ₹५,०००, तृतीय ₹४,०००, चतुर्थ ₹३,००० आणि पाचवा क्रमांक मिळविणाऱ्या संघाला ₹२,००० असे रोख पारितोषिक देण्यात येणार आहे. याशिवाय विजेत्या संघांना आकर्षक चषक व प्रमाणपत्र, तर स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

एका संघात ६ ते १५ विद्यार्थ्यांचा सहभाग –

प्रत्येक संघात किमान ६ आणि कमाल १५ विद्यार्थी असणे आवश्यक आहे. स्पर्धेत राष्ट्रभक्तीपर, प्रेरणादायी व संस्कारक्षम समूहगीत सादर करणे अपेक्षित असून मराठी, हिंदी किंवा संस्कृत भाषेतील गीतांना मान्यता राहणार आहे. चित्रपट गीतांना प्राधान्य दिले जाणार नाही. प्रत्येक संघाला सादरीकरणासाठी कमाल ७ मिनिटांचा कालावधी देण्यात येणार आहे.

रेकॉर्डेड ट्रॅकला मनाई –

समूहगीतासाठी संगीत साथ करणारे वादक संबंधित हायस्कूलमधील विद्यार्थी असणे आवश्यक आहे. मात्र, आवश्यक वादक उपलब्ध नसल्यास सावंतवाडी तालुक्यातील अन्य हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना संगीत साथ करण्याची परवानगी असेल. हार्मोनियम, तबला, ढोलकी, टाळ आदी मर्यादित वाद्यांचा वापर करता येणार आहे. मात्र, रेकॉर्डेड ट्रॅक, ऑर्केस्ट्रा अथवा इलेक्ट्रॉनिक संगीताचा वापर करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

सूर-तालासह शिस्तीचीही कसोटी –

स्पर्धेतील सादरीकरणाचे मूल्यमापन सूर, ताल, शब्दांची स्पष्टता, अभिव्यक्ती, समन्वय, शिस्त आणि एकूण सादरीकरण या निकषांवर करण्यात येणार आहे. परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्व स्पर्धकांवर बंधनकारक राहणार आहे.

८ ऑगस्टपर्यंत नावनोंदणी

स्पर्धेसाठी दि. ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. इच्छुक हायस्कूलनी आपली नावे सावंतवाडी भाजपा कार्यालयात दशरथ मांजरेकर – ७८७५५२५४९६ किंवा विनेश तावडे – ७७४४०५७९८९ यांच्याकडे नोंदवावीत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

 

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles