खाकीला ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान’ची साथ!, नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांचे स्वागत! ; ‘निस्वार्थ समाजसेवेचा हा प्रवास पोलीस यंत्रणेसोबत पुढे नेऊया!’, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या कार्याचे मगदूम यांच्याकडून कौतुक!

सावंतवाडी : समाजसेवेचा वसा घेत निस्वार्थ भावनेने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने सावंतवाडी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांची सदिच्छा भेट घेत त्यांचे मनःपूर्वक स्वागत व अभिनंदन केले. यावेळी सामाजिक बांधिलकी आणि पोलीस यंत्रणा यांच्यातील सहकार्याचा सेतू अधिक दृढ करण्याचा सकारात्मक सूर उमटला.

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चव्हाण यांची नुकतीच बदली झाली. आपल्या कार्यकाळात त्यांनी सावंतवाडी शहरात उत्कृष्टपणे सेवा बजावत नागरिकांशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते. त्यांच्या बदलीनंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. सतीश बागवे, उपाध्यक्ष प्रा. शैलेश नाईक, सचिव समीरा खलील, सदस्य रूपा मुद्राळे, शरदिनी बागवे, रवी जाधव तसेच प्रतिष्ठानचे कार्यकर्ते लक्ष्मण कदम उपस्थित होते.

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील विविध घटकांसाठी निस्वार्थ भावनेने कार्यरत असून, अडीअडचणीच्या प्रसंगी नागरिकांसह शासकीय यंत्रणेलाही संस्थेच्या माध्यमातून सहकार्य मिळत आले आहे. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन यांसह विविध क्षेत्रांत संस्थेने उभे केलेले सेवाकार्य म्हणजे समाजातील माणुसकीची ज्योत तेवत ठेवणारा एक प्रेरणादायी प्रवास ठरला आहे.

प्रतिष्ठानच्या सेवाभावी कार्याची माहिती जाणून घेतल्यानंतर पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनापासून कौतुक केले. “समाजासाठी कोणत्याही अपेक्षेशिवाय निस्वार्थपणे सेवा करणाऱ्या संस्थेसोबत काम करायला मला निश्चितच आवडेल. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. समाजहितासाठी पोलीस यंत्रणा आणि अशा सेवाभावी संस्थांनी एकत्रितपणे काम केल्यास निश्चितच अधिक चांगले परिणाम साधता येतील. तुम्हा सर्वांना भेटून मला खूप बरं वाटलं,” अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली.

खाकीची कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची सेवाभावना यांचा सुरेख संगम घडल्यास समाजहिताची वाट अधिक भक्कम होते. या भेटीमुळे सावंतवाडीतील सामाजिक कार्य आणि पोलीस यंत्रणा यांच्यातील सहकार्याला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles