गुणवंत विद्यार्थ्यांच्या पंखांना ‘सुर्वे’ यांची आर्थिक उभारी!, आरपीडी हायस्कूलच्या गुणवंतांसाठी ३० हजारांची देणगी! ; आई-वडिलांच्या स्मृती जपताना शिक्षणसेवेचा प्रेरणादायी वारसा.

सावंतवाडी. : शिक्षणाच्या वाटेवर यशाची पावले उमटविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांच्या भविष्यातील भरारीला बळ देण्याच्या उद्देशाने राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे माजी विद्यार्थी तथा कलंबिस्त हायस्कूलचे निवृत्त मुख्याध्यापक सीताराम न्हानू सुर्वे यांनी अनोखी सामाजिक बांधिलकी जपत ३० हजार रुपयांचा धनादेश शिक्षण प्रसारक मंडळाकडे सुपूर्त केला.

आरपीडी हायस्कूलमधून एसएससी परीक्षेत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्याला दरवर्षी बक्षीस देण्यासाठी ही रक्कम देण्यात आली आहे. शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव व्ही. बी. नाईक आणि उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर यांच्याकडे सुर्वे यांनी हा धनादेश सुपूर्त केला.

या देणगीतून मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून दरवर्षी एसएससी परीक्षेत आरपीडी हायस्कूलमध्ये द्वितीय क्रमांक पटकावणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, कै. न्हानू सीताराम सुर्वे आणि कै. काशिबाई न्हानू सुर्वे या आपल्या आई-वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

स्वतः ज्या शाळेच्या संस्कारांच्या छायेत घडले, त्याच शाळेतील पुढील पिढीच्या गुणवत्तेला हातभार लावणे, हीच आपल्या शिक्षणाची खरी परतफेड, या भावनेतून सुर्वे यांनी घेतलेला हा निर्णय विशेष कौतुकास्पद ठरत आहे.

सीताराम सुर्वे यांचा आरपीडी हायस्कूलशी असलेला हा ऋणानुबंधही तितकाच प्रेरणादायी आहे. त्यांनी १९७९ मध्ये याच शाळेतून एसएससी परीक्षेत द्वितीय क्रमांक मिळविला, तर पुढे १९८१ मध्ये बारावी (वाणिज्य) परीक्षा उत्तीर्ण केली. शिक्षणाच्या या प्रवासानंतर त्यांनी अध्यापन क्षेत्रात प्रवेश करत कलंबिस्त हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून प्रदीर्घ सेवा बजावली.

दरम्यान, आरपीडी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळाकडे आतापर्यंत २५ लाख रुपयांहून अधिक रकमेच्या ठेवी प्राप्त झाल्या असून, या निधीत सातत्याने भर पडत आहे. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची शाबासकी देत त्यांच्या स्वप्नांना आर्थिक बळ देणाऱ्या या उपक्रमाची माहिती डॉ. दिनेश नागवेकर यांनी दिली.

आई-वडिलांच्या स्मृतींना केवळ शब्दांनी नव्हे, तर गुणवंतांच्या भवितव्याला आकार देणाऱ्या कृतीने अभिवादन करण्याचा सुर्वे यांचा हा उपक्रम शिक्षणप्रेमींसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles