सिंधुदुर्गच्या आंबा-काजू बागायतदारांना हक्काची नुकसान भरपाई मिळणार! ; फळपीक विम्याच्या अडथळ्यांवर मंत्रालयात निर्णायक बैठक, तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करण्याचे निर्देश.

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या फळपीक विमा नुकसानभरपाईचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असलेल्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत यांनी सन २०२५-२६ मधील पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा सविस्तर आढावा घेतला.

हवामानातील बदल, वाढते तापमान आणि प्रतिकूल हवामानाचा सिंधुदुर्गातील आंबा व काजू पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा नुकसानभरपाई मिळणे हा त्यांच्या हक्काचा प्रश्न असून, काही पात्र शेतकरी अद्याप या लाभापासून वंचित असल्याचे बैठकीत निदर्शनास आले.

विशेषतः तांत्रिक नोंदी, कागदपत्रांमधील त्रुटी, हवामान केंद्रांशी संबंधित तांत्रिक अडचणी, महसूल मंडळांच्या नोंदी तसेच विमा दाव्यांमधील विसंगतींमुळे काही शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचे प्रस्ताव रखडले आहेत. काही विमा प्रस्ताव कागदपत्रांतील त्रुटींमुळे रद्द झाल्याचेही बैठकीत समोर आले.

यावर संबंधित अधिकाऱ्यांना सर्व त्रुटी तातडीने दूर करून पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काची नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.

रद्द झालेल्या विमा प्रस्तावांची आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून ते पुन्हा कार्यान्वित करण्याची कार्यवाही करावी, असेही स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच हवामान केंद्रांशी संबंधित तांत्रिक बाबी, महसूल मंडळांच्या नोंदी आणि विमा दाव्यांतील अडचणी सोडवण्यासाठी कृषी विभाग, महसूल प्रशासन, विमा कंपनी, सीएससी आणि संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असेही बैठकीत सांगण्यात आले.

“शेतकऱ्यांच्या हक्काच्या पैशात कोणताही अडथळा नको!”

सिंधुदुर्गातील आंबा-काजू उत्पादकांसाठी फळपीक विमा हा केवळ कागदोपत्री विषय नसून, निसर्गाच्या संकटात आधार देणारी आर्थिक सुरक्षा आहे. त्यामुळे तांत्रिक किंवा प्रशासकीय त्रुटींमुळे पात्र शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी संवेदनशीलतेने आणि गतिमान पद्धतीने कार्यवाही करण्याची गरज बैठकीत अधोरेखित करण्यात आली.

दरम्यान, या बैठकीस महाराष्ट्राचे कृषी आयुक्त सुरज मांढरे, कृषी आयुक्त पुणे, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला. याशिवाय सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधिकारी, सीएससी व्यवस्थापक वैभव देशपांडे, भारतीय कृषी विमा कंपनीचे व्यवस्थापक अनिल कुंभारे, सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश सावंत यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

आंबा-काजू उत्पादकांच्या आशा पुन्हा पल्लवित!

हवामानाच्या लहरीपणामुळे आधीच संकटात सापडलेल्या सिंधुदुर्गातील बागायतदारांसाठी विमा नुकसानभरपाईचा प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत देण्यात आलेले निर्देश प्रत्यक्षात कितपत वेगाने उतरतात, याकडे जिल्ह्यातील हजारो बागायतदारांचे लक्ष लागले आहे.

निसर्गाने हिरावून घेतलेले उत्पन्न…
आता विम्याच्या माध्यमातून तरी शेतकऱ्यांच्या हातात यावे,
हीच सिंधुदुर्गातील बागायतदारांची अपेक्षा आहे!

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles