मळगाव घाटीत धबधब्याच्या प्रवाहात आढळला बेपत्ता महेश पेडणेकरचा मृतदेह! ; मृत्यूचे गूढ कायम, पोलिसांचा तपास सुरू. 

सावंतवाडी : मित्रासोबत मासेमारीसाठी घराबाहेर पडलेले आणि त्यानंतर बेपत्ता झालेल्या माजगाव-कुंभारवाडी येथील महेश लक्ष्मण पेडणेकर (वय ४८) यांचा मृतदेह मळगाव घाटीतील दुसऱ्या धबधब्याच्या खालच्या बाजूला पाण्याच्या प्रवाहात संशयास्पद स्थितीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. दोन दिवसांपासून सुरू असलेल्या शोधमोहीमेला अखेर दुर्दैवी वळण मिळाल्याने पेडणेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (१० ऑगस्ट) दुपारी सुमारे १२ वाजता महेश पेडणेकर हे त्यांचे मित्र यशवंत उर्फ योगेश विष्णू परब (रा. चराठा) यांच्यासोबत तेरेखोल समुद्रात मासेमारीसाठी गेले होते. मात्र, बराच वेळ उलटूनही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. अखेर त्यांच्या पत्नी मिनल महेश पेडणेकर (वय ४०) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

त्यानुसार पोलिसांनी नापत्ता रजिस्टर क्रमांक ४०/२०२६ अन्वये नोंद करून शोध सुरू केला होता. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार पाटील करीत होते.

दरम्यान, मळगाव घाटीतील दुसऱ्या धबधब्याच्या खालच्या बाजूला पाण्याच्या प्रवाहात एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. मृतदेह महेश पेडणेकर यांचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर, माजी सभापती राजू परब यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तातडीने सावंतवाडी पोलिसांना माहिती दिली.

माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महेश पेडणेकर यांचा मृत्यू नेमका समुद्रात बुडाल्याने झाला की अन्य कोणत्या कारणाने ते मळगाव घाटीत पोहोचले, याचे गूढ अद्याप कायम असून या दिशेने पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या घटनेमुळे माजगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून, कुटुंबीय आणि नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles