सावंतवाडी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर पदव्या इतर विद्यापीठांच्या पदव्यांशी समकक्ष असून, एका पदवी अभ्यासक्रमासोबत अन्य अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आणखी एक पदवी अर्थात ‘ड्युएल डिग्री’ मिळविण्याची सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह संशोधन पदवी (पीएच.डी.) घेण्याची संधीही उपलब्ध होणार असल्याची माहिती विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार प्रा. संजय थोरात यांनी दिली.


यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्रवेश प्रक्रियेबाबत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सहाय्यक सल्लागार विजयसिंह रजपूत, केंद्र संयोजक तुषार वेंगुर्लेकर, यशवंत पाटील आदी उपस्थित होते.
प्रा. थोरात म्हणाले, कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यावर विद्यापीठाचा भर असून ‘पोर्ट मॅनेजमेंट’सारखे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर गेलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा ज्ञानाच्या प्रवाहात आणणे हा विद्यापीठाचा मुख्य उद्देश आहे. शिक्षणामध्ये ‘एआय’चा प्रभावी वापर करण्यावरही भर दिला जात आहे.
अभ्यासक्रमांमध्ये बदल झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संदर्भ पुस्तके उपलब्ध होण्यास काही प्रमाणात विलंब होतो, ही वस्तुस्थिती आहे. मात्र संबंधित वर्षानंतर विद्यार्थ्यांना या संदर्भात कोणत्याही प्रकारची अडचण राहत नसल्याचेही प्रा. थोरात यांनी स्पष्ट केले.
३.७४ लाख विद्यार्थी घेतात प्रवेश –
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना १ जुलै १९८९ रोजी नाशिक येथे झाली. महाराष्ट्र शासनाने मुक्त विद्यापीठातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या पदव्या शासकीय सेवा तसेच पदोन्नतीसाठी ग्राह्य धरण्याबाबत शासन निर्णय काढला आहे. तसेच इतर विद्यापीठांमध्ये पुढील उच्च शिक्षण घेण्यासाठीही या पदव्यांना मान्यता आहे.
विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र असून, राज्यात आठ विभागीय केंद्रे आणि १ हजार ६७५ हून अधिक अभ्यासकेंद्रे कार्यरत आहेत. विद्यापीठात १४५ हून अधिक अभ्यासक्रम असून दरवर्षी सुमारे ३.७४ लाख विद्यार्थी प्रवेश घेतात. ‘ज्ञानगंगा घरोघरी’ हे विद्यापीठाचे बोधवाक्य आहे. सर्वोत्कृष्ट संस्थेसाठी ‘कॉमनवेल्थ ऑफ लर्निंग’ या संस्थेने विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कारानेही गौरविले आहे.
सिंधुदुर्गात २२ अभ्यासकेंद्रे –
कोल्हापूर विभागीय केंद्राच्या कार्यक्षेत्रात कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बेळगाव आणि गोवा सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी एकूण १२० अभ्यासकेंद्रे आहेत. जुलै २०२६ पासून विविध अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध अभ्यासक्रमांची २२ अभ्यासकेंद्रे कार्यरत असून, भविष्यात जिल्ह्यात आणखी अभ्यासकेंद्रे सुरू करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.
प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी ycmou.digitaluniversity.ac.in किंवा ycmou.ac.in या संकेतस्थळांना भेट द्यावी. तसेच संबंधित अभ्यासकेंद्राशी प्रत्यक्ष संपर्क साधूनही प्रवेश निश्चित करता येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मार्गदर्शनासाठी कोल्हापूर विभागीय केंद्रात मदत कक्ष सुरू करण्यात आला असून ०२३१-२९९११७१, ०२३१-२९९११७२, ७४४७६०७०२२ आणि ७०३८६०७०२३ या क्रमांकांवर विविध अभ्यासक्रमांची माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. प्रवेशार्थींनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रा. थोरात यांनी केले.



