ही तर रिव्हर्स मायग्रेशनची सुरुवात, सिंधुदुर्गच्या विकासाला आता नवी गती देणार! : पालकमंत्री नितेश राणे. ; तळवणेत ‘झोया मरीन’चा भव्य जहाजबांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन संपन्न, तब्बल २०० स्थानिक युवक-युवतींना रोजगार! : मंत्री नितेश राणे यांचा निर्धार!

सावंतवाडी : कोकणच्या विकासाच्या क्षितिजावर आता उद्योग आणि रोजगाराची नवी पहाट उगवणार आहे. सावंतवाडी तालुक्यातील तळवणे येथे ‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’च्या भव्य जहाजबांधणी प्रकल्पाचे भूमिपूजन मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या प्रकल्पातून तब्बल २०० बोटींची निर्मिती होणार असून, परिसरातील २०० स्थानिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.

सिंधुदुर्गातून सुरू झालेली ही रिव्हर्स मायग्रेशनची सुरुवात आहे. आतापर्यंत रोजगारासाठी आपल्या जिल्ह्यातील तरुण गोवा, मुंबई आणि अन्य ठिकाणी जात होते; आता रोजगारच आपल्या दारी आणण्याचा प्रयत्न आहे,” असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

भूमिपूजन सोहळ्यात बोलताना मंत्री राणे म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्ह्याला महाराष्ट्राच्या औद्योगिक नकाशावर आणण्याचे काम माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केले. त्याच विकासाच्या वाटचालीला पुढे नेत जिल्ह्यात रोजगारनिर्मिती करणारे उद्योग आणण्याचा आपला निर्धार आहे. या प्रकल्पातून तयार होणाऱ्या पहिल्या बोटीच्या शुभारंभाला नारायण राणे यांना आवर्जून आणणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

 

२०० बोटींची निर्मिती; मुंबईच्या ‘वॉटर मेट्रो’साठीही काम

या प्रकल्पात तब्बल २०० बोटींचे बांधकाम होणार असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी मुंबई वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी आवश्यक बोटींच्या निर्मितीचे कामही सिंधुदुर्गात होणार असल्याची माहिती मंत्री राणे यांनी दिली. अत्याधुनिक चायना टेक्नॉलॉजीचा वापर करून जहाजबांधणी केली जाणार असून, कारखाना उभारल्यानंतर अवघ्या दीड ते दोन महिन्यांत पहिली बोट तयार करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्थानिक युवकांना केवळ रोजगारच नव्हे, तर आवश्यक कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यासाठीही सहकार्य केले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील युवकांनी बदलत्या औद्योगिक संधी ओळखून आवश्यक स्किल डेव्हलपमेंटकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले.

“विरोधाला उत्तर शब्दांनी नाही, कामातून देणार!”

जमिनीच्या व्यवहारांवरून काहीजण सिंधुदुर्गची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करत मंत्री राणे यांनी विरोधकांवर निशाणा साधला. “प्रत्येक आरोपाला उत्तर देत बसण्यापेक्षा विकासकामातून उत्तर देण्याचा माझा निर्धार आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

पर्यावरणपूरक प्रकल्पांची मागणी करणारे आंदोलनकर्ते अशा रोजगारनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पांच्या स्वागतासाठी पुढे का येत नाहीत, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जनतेने विकासाच्या नावाखाली दिशाभूल करणाऱ्यांचे चेहरे ओळखावेत आणि आपल्या मुलांच्या भवितव्याचा विचार करून विकासाला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

आरोंदा, रेडी, देवगड आणि शिरोड्यात विकासाची नवी दालने

सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर पर्यटन, जलवाहतूक आणि उद्योगांचे नवे पर्व सुरू करण्याचा निर्धार व्यक्त करत मंत्री राणे यांनी आरोंदा जेटीच्या उद्घाटनाची तयारी, रेडी बंदर पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा प्रयत्न तसेच देवगड बंदरही सुरू करण्याचा विश्वास व्यक्त केला.

आरोंदा-रोडी बंदर परिसरासह शिरोडा-वेळागर येथील ताज पंचतारांकित हॉटेल प्रकल्प लवकरच मार्गी लागणार असल्याचे सांगत दोडामार्गातही उद्योगांच्या माध्यमातून विकासाची नवी दिशा निर्माण केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

ही फक्त सुरुवात आहे. सावंतवाडीतून विकासाचा हा प्रवास सुरू झाला आहे. जिल्ह्यातील तरुणांच्या हाताला काम आणि उद्योगांना चालना देण्यासाठी मोठ्या गुंतवणुकीचे प्रयत्न सुरू आहेत. गोवा आणि कर्नाटकपेक्षाही मोठी गुंतवणूक सिंधुदुर्गात आणण्याचा शब्द दिला आहे,” असे मंत्री राणे म्हणाले.

मान्यवरांची उपस्थिती – 

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, माजी आमदार राजन तेली यांनी मनोगत व्यक्त केले. माजी सभापती संदीप नेमळेकर यांनी तळवणे गावात हा महत्त्वपूर्ण प्रकल्प आणल्याबद्दल आभार व्यक्त केले.

‘झोया मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड’चे संचालक जॉन फर्नांडिस, सूरज देवारीया, डॉ. निलेश बाणवलीकर, युवराज लखमराजे भोंसले, आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, काका कुडाळकर, सभापती सुस्मिता जाधव, उपसभापती गौरव मुळीक, जिल्हा परिषद सदस्या अपर्णा सातोसकर, पंचायत समिती सदस्या स्नेहा कांबळे, तळवणे सरपंच गोविंद केरकर, उबाठा शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्यासह विविध पदाधिकारी, कार्यकर्ते, अधिकारी आणि तळवणे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कंपनीचे संचालक जॉन फर्नांडिस यांनी केले. सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले, तर आभार मेरिटाईम बोर्डचे कार्यकारी अभियंता सुधीर देवरे यांनी मानले.

तळवणेच्या भूमीत पडलेली ही औद्योगिक विकासाची मुहूर्तमेढ सिंधुदुर्गच्या तरुणांच्या हाताला रोजगार आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला नवी उभारी देणारी ठरणार का, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles