मालवणी माती, बोलीभाषेचा गोडवा अन् माणसांच्या जगण्याची गोष्ट… ‘साकव’ ठरतेय रसिकांच्या मनाला भिडणारी वेब सिरीज!
कुडाळ : मालवणी मातीचा सुगंध, बोलीभाषेचा गोडवा आणि कोकणी माणसांच्या जगण्यातील सुख-दुःखांची हळवी वीण… या साऱ्यांचा सुरेख ‘साकव’ बांधत ‘साकव’ ही वेब सिरीज सध्या रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रसिद्ध अभिनेते आणि सिंधुदुर्गचे सुपुत्र दिगंबर नाईक यांच्या नेहमीपेक्षा हटके भूमिकेने या मालिकेला विशेष रंगत आणली असून जिल्ह्यातील स्थानिक कलाकारांनीही आपल्या अभिनयाने रसिकांची मने जिंकली आहेत.
‘इट्समज्जा’ या युट्युब वाहिनीवर दर गुरुवारी प्रसारित होणारी ही वेब सिरीज सध्या अनेकांच्या आवडीचा विषय ठरत आहे. विशेष म्हणजे, पडद्यावर दिसणाऱ्या व्यक्तिरेखांमध्ये अनेकांना आपल्या आजूबाजूच्या माणसांचे, नात्यांचे आणि स्वतःच्या आयुष्याचे प्रतिबिंब दिसत असल्याने ‘साकव’ रसिकांच्या हृदयापर्यंत पोहोचल्याचे जाणवत आहे.
विनोदाच्या चौकटीबाहेरचा दिगंबर नाईक!
विनोदी भूमिकांमधून रसिकांना खळखळून हसविणारे दिगंबर नाईक यावेळी मात्र एका वेगळ्याच रंगात पाहायला मिळत आहेत. एसटी महामंडळात वाहकाची नोकरी करणारा आणि आपल्या मुलाने मोठा सरकारी अधिकारी व्हावे, यासाठी आयुष्याची सारी धडपड पणाला लावणारा संवेदनशील ‘बाप’ त्यांनी अत्यंत ताकदीने साकारला आहे.
हसवणाऱ्या कलाकाराच्या चेहऱ्यामागे दडलेला कष्टकरी बाप, त्याची स्वप्ने, मुलासाठीची धडपड आणि भावनिक संघर्ष दिगंबर नाईक यांनी अत्यंत सहजतेने उभा केला आहे. त्यामुळे त्यांची ही भूमिका रसिकांसाठी निश्चितच सुखद धक्का ठरत आहे.
मालवणी भाषेच्या गोडव्याला ‘साकव’ची भावनिक साथ!
सिनेमा, नाटक आणि मालिका क्षेत्रात मालवणी भाषेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. मालवणी बोलीचा गोडवा, मिश्कीलपणा आणि माणुसकीचा ओलावा यामुळे या भाषेतील कलाकृतींना महाराष्ट्रासह इतर भागातील रसिकांकडूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गच्या मातीत आकाराला आलेली ‘साकव’ ही वेब सिरीज मालवणी संस्कृती आणि कोकणी जीवनशैलीला डिजिटल पडद्यावर नवा आयाम देत आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील कलाकारांनाही मालवणी भाषेची भुरळ पडली असून या बोलीभाषेच्या माध्यमातून साकारलेली ‘साकव’ आता जिल्ह्याच्या सीमा ओलांडून रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
दिगंबर नाईक यांच्यासोबत कोकणच्या कलाकारांची मांदियाळी!
या मालिकेत दिगंबर नाईक यांच्या पत्नीची भूमिका अस्मिता खटखटे यांनी साकारली आहे. तर त्यांच्या ‘बंड्या’ या मुलाची भूमिका श्रेयस काटकर याने साकारली आहे.
यांच्यासोबतच संजिता गिरप, तन्वी धुरी, रोशन चव्हाण, सत्यवान गावकर, गौरव राऊळ, चंद्रहास राऊळ, वनिता शिंदे, अभय नेवगी, संतोष रेडकर, निकेत हळवे, सिद्धी परब, तन्मय राऊत, सुधीर धुमे, निलेश उर्फ बंड्या जोशी, हेमाश्री घाटे, हर्षल जाधव, सोहम कुडाळकर, अजित मांजरेकर, सुहास नाईक, बाळ पुराणिक, मुकुंद नाईक, गजेंद्र कोठावळे आणि प्रवीण सावंत अशा अनेक स्थानिक कलाकारांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे.
स्थानिक कलाकारांना मिळालेला हा डिजिटल व्यासपीठाचा मंच सिंधुदुर्गच्या कलाक्षेत्रासाठीही आशादायी ठरत आहे.
लेखनापासून पार्श्वसंगीतापर्यंत कलाकृतीची दमदार बांधणी –
‘साकव’चे लेखक, पटकथाकार आणि संवादलेखक नितीन पवार असून नितीन वडेवाले यांनी मालिकेचे दिग्दर्शन केले आहे. सौरिंद्रनाथ दत्त आणि मीडिया व सोल्युशन यांनी या वेब सिरीजची निर्मिती केली आहे.
अंकिता लोखंडे क्रिएटिव्ह हेड, तर वरुण जोशी असोसिएट डायरेक्टर आहेत. मंदार पाटील यांच्या प्रभावी पार्श्वसंगीतामुळे कथानकातील भावनिक क्षणांना अधिक गहिरेपणा लाभला आहे. तर यश भगरे यांनी डीओपी म्हणून मालिकेचे दृश्यविश्व प्रभावीपणे साकारले आहे.
‘साकव’ म्हणजे केवळ वेब सिरीज नव्हे; माणसांच्या भावविश्वाला जोडणारा पूल!
‘साकव’ म्हणजे दोन काठांना जोडणारा पूल… आणि या मालिकेनेही मालवणी माती, कोकणी माणूस आणि रसिकांचे भावविश्व यांच्यात एक सुंदर भावनिक साकव उभारला आहे.
कथेतील व्यक्तिरेखा, त्यांचे संघर्ष, नाती आणि स्वप्नांमध्ये रसिकांना स्वतःचे किंवा आपल्या आजूबाजूच्या माणसांचे प्रतिबिंब दिसत आहे. त्यामुळे मनोरंजनासोबतच मनाच्या हळव्या कोपऱ्याला स्पर्श करणारी कलाकृती म्हणून ‘साकव’ची चर्चा रंगत आहे.
मालवणी बोलीचा गोडवा, कोकणी माणसांच्या जगण्याची धडधड आणि दिगंबर नाईक यांच्या अभिनयाचा नवा रंग… या त्रिवेणीमुळे ‘साकव’चा प्रवास आता रसिकांच्या मनात कायमचा ठसा उमटवताना दिसत आहे.



