सावंतवाडीच्या आरोग्यसेवेला ‘राजेशाही’ दिलासा!, मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचा मार्ग मोकळा!; राजघराण्याकडून करोडो रुपयांची ७० गुंठे जमीन शासनाला विनामोबदला.

सावंतवाडी : सावंतवाडीकरांच्या अनेक वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शहरातील प्रस्तावित मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीतील जागेचा तिढा न्यायालयीन प्रक्रियेतून सुटला असून, रुग्णालयाच्या स्वप्नाला आता प्रत्यक्ष आकार येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जनहिताला सर्वोच्च प्राधान्य देत सावंतवाडी राजघराण्याचे सर्वेसर्वा श्री. खेम सावंत शिवराम सावंत भोंसले यांनी शहरातील मोक्याच्या ठिकाणी असलेली करोडो रुपये किमतीची तब्बल ७० गुंठे जमीन महाराष्ट्र शासनाला विनामोबदला सुपूर्द केली आहे.

आरोग्यसेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या या निर्णयामुळे सावंतवाडी शहरासह तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या उभारणीचा मार्ग आता अधिक सुकर झाला असून, ‘रुग्णालयासाठी जागा’ हा प्रमुख अडथळा दूर झाल्याने आरोग्यसेवेच्या नव्या पर्वाची नांदी झाली आहे.

न्यायालयीन तिढा सुटला; राजघराण्याचे मोलाचे सहकार्य

या जागेच्या मालकी हक्कासंदर्भातील प्रकरणाची सुनावणी उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठासमोर झाली. या न्यायालयीन प्रक्रियेदरम्यान सावंतवाडी संस्थानच्या कुटुंबीयांनी वेळेत आवश्यक प्रतिज्ञापत्रे सादर करून प्रशासन व न्यायालयीन प्रक्रियेला पूर्ण सहकार्य केले.

रुग्णालयाच्या मंजुरीसाठी श्री. खेम सावंत भोंसले आणि श्री. लखमराजे खेम सावंत भोंसले यांनी वरिष्ठ शासकीय पातळीवर स्वखर्चाने वारंवार पाठपुरावा केला. त्यामुळे केवळ जमीन देण्यापुरते मर्यादित न राहता रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी राजघराण्याकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘राजेशाही’ केवळ इतिहासात नाही; समाजसेवेची परंपरा आजही कायम!

सावंतवाडी संस्थानचा इतिहास केवळ राजवैभवाचा नाही, तर समाजहित आणि लोककल्याणाची परंपरा जपणाऱ्या योगदानाचा देखील आहे. सार्वजनिक उपयोगाच्या विविध उपक्रमांसाठी संस्थानने यापूर्वीही आपली जमीन विनामोबदला उपलब्ध करून दिली आहे.

सावंतवाडी गार्डन, शिल्पग्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, राणी जानकीबाई सुतिकागृह तसेच नरेंद्र डोंगरावरील पाण्याची टाकी यांसारख्या अनेक सार्वजनिक प्रकल्पांसाठी संस्थानने दिलेले योगदान आजही सावंतवाडीच्या सामाजिक इतिहासाचा अविभाज्य भाग आहे.

शिवरामराजेंनी रुजवलेली सामाजिक बांधिलकीची बीजे आजही फुलतायत!

भूतपूर्व अधिपती श्रीमंत शिवरामराजे खेम सावंत भोंसले यांनी सुरू केलेली समाजहिताची ही परंपरा आजच्या पिढीनेही तितक्याच निष्ठेने पुढे नेली आहे. श्री. खेम सावंत भोंसले, सौ. शुभदादेवी खेम सावंत भोंसले, श्री. लखमराजे खेम सावंत भोंसले आणि नगराध्यक्षा सौ. श्रद्धाराजे लखम सावंत भोंसले यांच्या माध्यमातून ही सामाजिक बांधिलकीची परंपरा कायम असल्याचे या निर्णयातून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

सावंतवाडीच्या आरोग्यविश्वात नव्या पर्वाची चाहूल!

मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारणीसाठी करोडो रुपये किमतीची जमीन विनामोबदला शासनाला देण्याचा निर्णय हा सावंतवाडीच्या सार्वजनिक जीवनातील अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे. आरोग्यसेवेची गरज ओळखून राजघराण्याने दाखविलेला उदार दृष्टिकोन आणि जनहिताची भूमिका सावंतवाडीच्या सामाजिक वाटचालीत मैलाचा दगड ठरणारी आहे.

या संपूर्ण प्रकरणात सकारात्मक आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याबद्दल उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ, सर्व पक्षकार, वकील तसेच संबंधित शासकीय अधिकारी यांचे सावंतवाडी राजघराण्याच्या वतीने आभार मानण्यात आले आहेत.

करोडोंची जमीन जनतेच्या आरोग्यासाठी अर्पण… आता प्रतीक्षा केवळ अत्याधुनिक रुग्णालयाची! सावंतवाडीकरांच्या अनेक वर्षांच्या स्वप्नाला आता प्रत्यक्ष वास्तवाची किनार मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles