कळमगाव-बिरवाडी विभागातील ३८ शाळांमध्ये ‘जिजाऊ’कडून वह्यांचे वाटप, शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना बळ. ; शिक्षक, पालकांकडून उपक्रमाचे कौतुक!

कळमगाव : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची कमतरता भासू नये आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये, या उद्देशाने जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र व जिजाऊ संघटना शहापूर यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या मोफत वही वाटप अभियानाला कळमगाव-बिरवाडी विभागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विभागातील तब्बल ३८ शाळांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.

शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत यावेळी शिक्षक व पालकांनी व्यक्त केले.

जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून शहापूर तालुक्यातील विविध गावांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सातत्याने शैक्षणिक उपक्रम राबविले जात आहेत. केवळ वह्या वाटप न करता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, त्यांच्या मनात मोठी स्वप्ने निर्माण करणे आणि भविष्यात विविध क्षेत्रांत सक्षम पिढी घडविणे, हा या अभियानामागील उद्देश असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

गावागावातून गुणवंत विद्यार्थी घडविणे हेच ध्येय – दिनेश निमसे

यावेळी बोलताना जिजाऊ संघटना शहापूरचे तालुका प्रमुख तथा रत्नागिरी संपर्क प्रमुख दिनेश निमसे म्हणाले, “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता आणि क्षमता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र अनेक वेळा आर्थिक परिस्थितीमुळे त्यांच्या शिक्षणाच्या वाटचालीत अडथळे येतात. विद्यार्थ्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून ही जबाबदारी सातत्याने पार पाडली जात आहे. विद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करून मनापासून अभ्यास करावा आणि आपल्या गावातून मोठमोठे अधिकारी, डॉक्टर, अभियंते आणि विविध क्षेत्रातील गुणवंत घडावेत, हीच आमची अपेक्षा आहे.”

या कार्यक्रमाला जिजाऊ संघटना शहापूरचे तालुका प्रमुख तथा रत्नागिरी संपर्क प्रमुख दिनेश निमसे, सुदर्शन पाटील (तालुकाध्यक्ष, जिजाऊ संस्था शहापूर), दिनेश उमवणे (सहाय्यक अभियंता, मुंबई महानगरपालिका), अरुणा मेंगाळ (सरपंच, बिरवाडी), लिलाधर भोईर (उपसरपंच, कळमगाव) यांच्यासह विठ्ठल दादा भोईर, पुरुषोत्तम भेरे, बाळूकाका भेरे, काशिनाथ खांडे, यशवंत भेरे, जनार्दन भेरे, सुधीर घावट, कळमगाव ग्रामपंचायत सदस्य राम मुकणे, योगेश गोदडे, नरेश गोडे, धनंजय निपुर्ते, सागर निपुर्ते, राकेश भोईर, शिवाजी वेखंडे, विकास वेखंडे, दौलत शिरोसे, सुधीर वाघ, भूषण ठाकरे, योगेश वाघ, वासुदेव कातकरी, प्रदीप दुभेले, सखाराम वेखंडे, राज मेंगाळ, रवींद्र सासे, सचिन खाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

शैक्षणिक उपक्रमाची गरज –

ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदी करताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन जिजाऊ संस्थेने मोठ्या प्रमाणावर मोफत वही वाटप अभियान हाती घेतले आहे. कळमगाव-बिरवाडी विभागातील ३८ शाळांपर्यंत पोहोचलेल्या या अभियानामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, शिक्षणासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

शाळांमध्ये वही वाटप करताना शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी जिजाऊ संस्थेच्या या उपक्रमाचे स्वागत केले. “विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात देत त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा देणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी,” अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles