सावंतवाडी : तळकोकणातील सर्वात जास्त ट्विस्ट निर्माण झाला आहे तो सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात. कारण तीन दिवसांपूर्वी भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत प्रवेश केला आणि सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील ठाकरे शिवसेनेत एक प्रकारे नवचैतन्य निर्माण केले. मात्र त्यांच्या या प्रवेशामुळे मागील आठ वर्षे प्रामाणिक जनसेवेचा ध्यास घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुसंस्कृत उमेदवार अर्चना घारे – परब यांची वाट काहीशी अडचणीची झाली आहे. मात्र असे असले तरी अद्यापही अर्चना घारे यांनी आपल्या उमेदवारीबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. त्याचे कारण म्हणजे वरिष्ठांशी अजूनही चर्चा विनिमय सुरू असून पक्षाचे ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार यांनी अजूनही सकारात्मक प्रतिसाद दिल्यामुळे अर्चना घारे यांची उमेदवारी अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे.
पुढील दोन दिवसात संपूर्ण चित्र समोर आल्यानंतर अर्चना घारे – परब कोणता निर्णय घेतात?, याकडे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. मात्र असे असले तरी अर्चना घारे – परब यांच्या निष्ठेचे फळ त्यांना मिळालेच पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तमाम पदाधिकारी व विशेषतः महिला वर्गाची अपेक्षा आहे.