सावंतवाडी : सावंतवाडी मतदारसंघाने तब्बल तीन वेळा संधी देऊनही दीपक केसरकर जनतेचे प्रश्न सोडवण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. राज्यातील सर्वात निष्क्रिय आमदार आणि मंत्री दीपक केसरकर आहेत. यावेळी लोकं तुमचा ‘मी’पणाचे गर्वहरण नक्की करतील आणि तुम्हाला जर्मनी पाठवल्याशिवाय जनता राहणार नाही, असा जोरदार घणाघात उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे राजन तेली यांनी केला आहे.
सावंतवाडी येथे आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ, संघटक मायकेल डिसोजा, अल्पसंख्यांक अध्यक्ष रियाज खान आदी उपस्थित होते.
दरम्यान यावेळी राजन तेली यांनी दीपक केसरकर यांच्यावर चांगलाच प्रहार केला. लोकांना भावनिक करणे सोडून द्या, आजपर्यंत भावनिक करून लोकांची दिशाभूल करून आपण राजकारण केले. आज जनता तुम्हाला कंटाळली असून तुमच्या आश्वासनांना आता जनता भुलणार नाही. तुम्हाला घरी बसलेल्याशिवाय किंबहुना जर्मनीला पाठवल्याशिवाय सावंतवाडी विधानसभा मतदार संघातील मतदार गप्प बसणार नाहीत, असा जोरदार टोला त्यांनी यावेळी लगावला.