केसरीत घुमला ‘मन की बात’चा संदेश! ; प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह भाजप पदाधिकारी-कार्यकर्त्यांनी ऐकला पंतप्रधान मोदींचा संवाद!

सावंतवाडी : देशाच्या विकासाचा ध्यास, युवकांच्या उज्ज्वल भवितव्याची चिंता आणि समाजहिताच्या विविध पैलूंना स्पर्श करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १३७ वा भाग केसरी येथे उत्साहपूर्ण वातावरणात ऐकण्यात आला. भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमवेत केसरी येथील केएसआर ग्लोबल एक्वेरियम येथे कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहिले.

‘मन की बात’च्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प अधोरेखित करत युवकांना नशामुक्त भारताचा महत्त्वपूर्ण संदेश दिला. त्याचबरोबर समाजहित, राष्ट्रनिर्मिती आणि नागरिकांच्या सहभागातून देशाला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेण्याच्या दिशेने विविध विषयांवर देशवासीयांशी संवाद साधला.

केसरी येथील केएसआर ग्लोबल एक्वेरियम येथे आयोजित करण्यात आलेल्या या थेट प्रक्षेपणाला भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी यांचे विचार आत्मीयतेने ऐकले. राष्ट्राच्या प्रगतीचा विचार घराघरापर्यंत पोहोचविणारा आणि सामान्य नागरिकांच्या भावनांना थेट स्पर्श करणारा हा संवाद असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी जिल्हा परिषदेच्या कोलगाव मतदारसंघाचे सदस्य मायकल डिसोजा, सावंतवाडी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अॅड. अनिल निरवडेकर, सावंतवाडी पंचायत समितीचे उपसभापती गौरव मुळीक, भाजपा आंबोली मंडळ युवा मोर्चाचे अध्यक्ष विनेश तावडे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात’ हा केवळ संवादाचा कार्यक्रम नसून लोकाभिमुख नेतृत्वाचा संवेदनशील आरसा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातील सामान्य नागरिक, त्यांचे प्रयत्न, समस्या, नवकल्पना आणि राष्ट्रनिर्मितीतील योगदान यांना या माध्यमातून व्यासपीठ मिळते. त्यामुळे ‘मन की बात’ हा उपक्रम सामान्य जनतेशी थेट नाळ जोडणारा प्रभावी संवाद ठरत आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या विचारांनी प्रेरित होऊन राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देत समाजाच्या प्रत्येक घटकाने विकासाच्या प्रवाहात सहभागी व्हावे, असा संदेश या कार्यक्रमातून उपस्थित कार्यकर्त्यांमध्येही रुजला.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles