सावंतवाडी : तळवडे शिक्षण प्रसारक मंडळ, तळवडेच्या सन २०२६-२०३१ या कालावधीसाठी झालेल्या कार्यकारी मंडळाच्या निवडणुकीत ‘तळवडे पंचक्रोशी शिक्षण विकास पॅनेल’ने दणदणीत विजय मिळवत संस्थेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले. पॅनेलच्या तब्बल १२ पैकी १२ उमेदवार विजयी झाल्याने १२-० असा एकतर्फी निकाल लागला. या निकालामुळे तळवडेच्या शैक्षणिक वर्तुळात ‘पंचक्रोशी’च्या विजयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
तळवडे शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यकारी मंडळासाठी तब्बल ६८ वर्षांनंतर प्रथमच निवडणूक झाली. त्यामुळे या निवडणुकीकडे संपूर्ण तळवडे पंचक्रोशीचे लक्ष लागले होते. ‘तळवडे पंचक्रोशी शिक्षण विकास पॅनेल’ आणि ‘तळवडे शिक्षण विकास पॅनेल’ यांच्यात थेट लढत झाली. एकूण २२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.
‘कपबशी’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या तळवडे पंचक्रोशी शिक्षण विकास पॅनेलने सर्वच १२ जागांवर बाजी मारत विरोधी पॅनेलला भोपळाही फोडू दिला नाही. मतदारांनी पॅनेलच्या सर्व उमेदवारांवर विश्वास व्यक्त केल्याने हा निकाल विशेष लक्षवेधी ठरला आहे.
विजयी उमेदवारांमध्ये उमाकांत काशिनाथ भगत, विजय कृष्णाजी बुगडे, विजय बापुजी फेंद्रे, सुरेश जगन्नाथ गावडे, बाबुराव दत्ताराम गोडकर, देवेश शिवराम कावळे, भालचंद्र अनंत कांडरकर, भूषण लवू पेडणेकर, न्हानू विष्णू पेडणेकर, श्रीकृष्ण शंकर पेडणेकर, शंकर संभाजी उर्फ बाळू साळगावकर आणि संतोष विठ्ठल सावंत यांचा समावेश आहे.
संस्थेच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली गेलेली ही निवडणूक पंचक्रोशीच्या एकजुटीचे दर्शन घडविणारी ठरली. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व समर्थकांनी जल्लोष केला. या अभूतपूर्व विजयामुळे पॅनेलच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
नवनिर्वाचित कार्यकारी मंडळासमोर आता संस्थेच्या शैक्षणिक प्रगतीला नवी दिशा देण्याचे आव्हान आहे. विद्यार्थ्यांचे हित, गुणवत्तापूर्ण शिक्षण, संस्थेचा सर्वांगीण विकास आणि तळवडे पंचक्रोशीतील शैक्षणिक क्षेत्र अधिक सक्षम करण्याला प्राधान्य देत काम करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, निवडणुकीतील विजयानंतर नवनिर्वाचित उमेदवारांनी केसरी येथे भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी निवडणुकीतील विजयाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या भेटीमुळे विजयानंतरच्या राजकीय-सामाजिक घडामोडींनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.



