वाचनातून आत्मनिर्भर बना, थोर नेत्यांच्या चरित्रातून प्रेरणा घ्या! : प्रा. डॉ. राजेंद्र मुंबरकर. ; सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी-कर्मचारी संघाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहात.

✍️ मोहन जाधव.

सिंधुदुर्गनगरी : विद्यार्थ्यांनी केवळ अभ्यासाच्या चौकटीत न राहता चौफेर वाचनाची कास धरून ज्ञानाचा संचय करणे ही आजच्या काळाची गरज आहे. वाचनातून विचार समृद्ध होतात, आत्मविश्वास वाढतो आणि विद्यार्थी आत्मनिर्भर बनतो. थोर नेते व महापुरुषांची चरित्रे विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर मार्गदर्शक ठरतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी वाचनाच्या माध्यमातून आत्मनिर्भर होण्याचा संकल्प करावा, असे आवाहन कणकवली येथील गोपुरी आश्रमाचे अध्यक्ष तथा कणकवली महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी केले.

सेवानिवृत्त बौद्ध अधिकारी-कर्मचारी संघ, सिंधुदुर्ग यांच्या वतीने रविवारी सिंधुदुर्गनगरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाच्या सभागृहात विद्यार्थी गुणगौरव सोहळा व संस्थेच्या आजीव सभासदांचा सत्कार असा संयुक्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मुंबरकर बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तथागत नागरिक पतसंस्थेचे अध्यक्ष अरविंद वळंजू होते.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर संघटनेचे अध्यक्ष तथा सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत कदम, मिलिंद जाधव, सचिव मिलिंद सरपे, खजिनदार रमेश कदम आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण करण्यात आले. ममता जाधव यांनी स्वागतगीत सादर करून उपस्थितांचे स्वागत केले, तर श्रद्धा कदम यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे सामुदायिक वाचन केले.

संस्थेचे माजी सचिव मोहन जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून संघटनेच्या स्थापनेचा इतिहास आणि आजवरच्या सामाजिक उपक्रमांचा आढावा घेतला. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्थापन झालेली ही संस्था जिल्ह्याच्या तळागाळापर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. गुणवंत विद्यार्थ्यांचा हा गौरव म्हणजे त्यांच्या भविष्यातील वाटचालीला प्रेरणा देणारे पाऊल असून, या विद्यार्थ्यांनी विविध उच्च पदांवर पोहोचून समाजाची बांधिलकी जपावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्ह्यातील शालांत व उच्च माध्यमिक परीक्षांसह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन त्यांच्या गुणवत्तेचा गौरव करण्यात आला. सत्कारार्थी बांदा येथील चिन्मय शांताराम आसनकर आणि वेंगुर्ले येथील केतकी वेंगुळेकर यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

‘यशाची पहिली पायरी पार केली; आता चांगला माणूस होण्याचे ध्येय ठेवा!’

अध्यक्षीय भाषणात अरविंद वळंजू यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. जीवनातील यशाची पहिली पायरी विद्यार्थ्यांनी पार केली असली, तरी अंतिम ध्येय हे केवळ मोठे पद मिळविण्याचे नसून एक चांगला आणि कर्तृत्ववान माणूस बनण्याचे असावे, असे त्यांनी सांगितले. समाजाने आपल्याला दिलेले ऋण फेडण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

‘शॉर्टकट नव्हे, ध्येय गाठण्यासाठी जिद्द, सातत्य आणि प्रामाणिकपणा हवा!’

प्रमुख अतिथी डॉ. राजेंद्र मुंबरकर यांनी आपल्या प्रतिकूल कौटुंबिक परिस्थितीतून उच्च ध्येय ठेवत केलेल्या प्रगतीचा प्रवास विद्यार्थ्यांसमोर मांडला. जगातील तसेच देशातील अनेक यशस्वी व्यक्तींच्या जीवनातील संघर्ष आणि यशाचे टप्पे त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडले.

जीवनात शॉर्टकटपेक्षा अंतिम ध्येय महत्त्वाचे असते. ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्य आवश्यक आहे. प्रामाणिकपणा, सचोटी आणि संस्कार या त्रिसूत्रीचा जीवनात अवलंब करा. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. ज्ञानसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून जीवनाची वाटचाल करा, असा मोलाचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

कार्यक्रमाच्या शेवटी संघटनेचे खजिनदार रमेश कदम यांनी आभार मानले. सूत्रसंचालन ममता जाधव व श्रद्धा कदम यांनी केले. यावेळी फुले-आंबेडकर चळवळीतील जिल्ह्यातील अनेक नामवंत कार्यकर्ते, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, दुपारच्या सत्रात संघटनेची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. यावेळी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles