सावंतवाडी : गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने सावंतवाडी रेल्वे स्थानकावर उतरलेल्या हजारो चाकरमान्यांची गैरसोय टाळण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानक ते दोडामार्ग-तिलारी थेट एसटी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी बाबुराव दत्ताराम धुरी यांनी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे केली आहे.
गणेशोत्सवासाठी मुंबईसह विविध शहरांतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात दाखल होतात. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर उतरलेल्या प्रवाशांना दोडामार्ग तालुक्यात जाण्यासाठी थेट एसटी सेवा उपलब्ध नसल्याने मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. रेल्वे स्थानकापासून सावंतवाडी बसस्थानकापर्यंत जाण्यासाठी प्रवाशांना जादा रिक्षा भाडे द्यावे लागते. त्यानंतर बस बदलावी लागत असल्याने प्रवास अधिक किचकट आणि खर्चिक ठरत असल्याचे धुरी यांनी निवेदनात नमूद केले आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी गणेशोत्सवापूर्वी किमान सात दिवस अगोदरपासून सावंतवाडी रेल्वे स्थानक ते नॉन-स्टॉप बांदा ते दोडामार्गमधील सर्व थांबे आणि पुढे तिलारी/पाटये पुनर्वसन केंद्रापर्यंत थेट बससेवा सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
गणेशोत्सव काळात रेल्वेने मोठ्या संख्येने प्रवासी येत असल्याने ही थेट बससेवा सुरू झाल्यास चाकरमानी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने या मागणीची तातडीने दखल घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा बाबुराव धुरी यांनी व्यक्त केली.
दरम्यान, स्थानिक पातळीवरून कार्यवाही न झाल्यास परिवहन मंत्र्यांकडे याबाबत मागणी करण्यात येईल, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दोन दिवसांत देण्यात यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या गर्दीपूर्वीच थेट एसटी सेवा सुरू होणार का? याकडे आता दोडामार्ग-तिलारी परिसरातील चाकरमानी आणि प्रवाशांचे लक्ष लागले आहे.



