संजू परब यांना समाजभूषण पुरस्कार तर महेश सावंत, अंकिता मोडक यांचीही पुरस्कारांसाठी निवड. ; नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर.

सावंतवाडी : शिक्षक दिनाचे औचित्य साधून समाजसेवा, शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत दरवर्षी नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेमार्फत प्रदान करण्यात येणारे जिल्हास्तरीय समाजभूषण पुरस्कार, उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार आणि उपक्रमशील आदर्श शिक्षिका पुरस्कार यंदा जाहीर करण्यात आले आहेत. संस्थेचे अध्यक्ष श्री. आत्माराम भिकाजी राऊळ यांनी पुरस्कारांची घोषणा केली.

सामाजिक बांधिलकीचा सन्मान – संजू परब यांना समाजभूषण पुरस्कार – 

नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व आश्रयदाते कै. श्रीपाद गोविंद तथा तात्यासाहेब पोकळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श समाजभूषण पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते श्री. सच्चिदानंद उर्फ संजू जगन्नाथ परब यांना जाहीर झाला आहे.

मडुरा तसेच सावंतवाडी परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना आरोग्यविषयक अडचणी, विवाहकार्य तसेच विविध कौटुंबिक संकटांच्या काळात त्यांनी वैयक्तिक पातळीवर आर्थिक मदतीचा हात दिला आहे. तरुणांना स्वावलंबी बनविण्यासाठी विविध उपक्रम राबवून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे कार्यही त्यांनी केले आहे.

कोकणची समृद्ध कला-संस्कृती जपण्यासाठी दशावतारी कलावंत आणि खेळाडूंना प्रोत्साहन, विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन तसेच सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य केले आहे. ‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ या विचारातून समाजकार्यात सातत्याने योगदान देणाऱ्या परब यांनी सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष म्हणूनही शहराच्या विकासासाठी व नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योगदान दिले आहे.

या बहुआयामी सामाजिक कार्याची दखल घेत संस्थेने त्यांची समाजभूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे.

शिक्षणातील नवोपक्रमांचा गौरव; महेश सावंत यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक कै. जयसिंगराव भालजी पेंढारकर यांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणारा उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार यंदा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, इन्सुली नं. ७, ता. सावंतवाडी येथील उपक्रमशील शिक्षक श्री. महेश लाडू सावंत यांना जाहीर झाला आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन, विज्ञान प्रदर्शनातील सहभाग, विज्ञान साहित्य निर्मिती तसेच विद्यार्थ्यांना अचूक मार्गदर्शन करून तालुकास्तरावर मिळवून दिलेले यश यामुळे त्यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली आहे.

शासनाच्या नवोपक्रम स्पर्धेत सातत्यपूर्ण सहभाग नोंदवत बक्षिसपात्र कामगिरी, तसेच महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळ, बालभारती, पुणे येथील इंग्रजी विषय समितीचे सदस्य म्हणून केलेले मोलाचे योगदान यामुळे त्यांच्या शैक्षणिक कार्याला वेगळी उंची प्राप्त झाली आहे.

शिक्षणातील सर्जनशीलतेला सलाम; अंकिता मोडक यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार

सहकार महर्षी कै. शिवराम भाऊ जाधव यांच्या सहकार व शिक्षण क्षेत्रातील कार्यात त्यांच्या पत्नी कै. प्रमिला शिवराम जाधव यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानाच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणारा उपक्रमशील आदर्श शिक्षिका पुरस्कार यंदा एस. एल. देसाई विद्यालय, पाट, ता. कुडाळ येथील उपक्रमशील शिक्षिका सौ. अंकिता विलास मोडक यांना जाहीर झाला आहे.

उत्कर्षा उपक्रम, साक्षरता उपक्रम, दिव्यांग विद्यार्थ्यांना इंग्रजीचे मार्गदर्शन, वारली पेंटिंग, स्वरचित काव्यलेखन, सांस्कृतिक कार्यक्रमांतील सहभाग तसेच मूल्यवर्धित प्रशिक्षणामध्ये तालुकास्तरीय मार्गदर्शन अशा विविधांगी उपक्रमांत त्यांनी उल्लेखनीय योगदान दिले आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत त्यांची आदर्श शिक्षिका पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

पारदर्शक परीक्षणातून पुरस्कारार्थींची निवड

आदर्श शिक्षक व शिक्षिका पुरस्कारांसाठी प्राप्त झालेल्या प्रस्तावांचे संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. राम खुबा राठोड तसेच शिक्षकवर्ग यांनी परीक्षण करून पुरस्कारार्थींची निवड केली.

या संपूर्ण पुरस्कार प्रक्रियेचे तसेच कार्यक्रमाचे पद्धतशीर नियोजन करून तो यशस्वी करण्यासाठी शाळेचे सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. अनिल लक्ष्मण कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

समाजसेवेची निष्ठा, शिक्षणातील नवोपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करून नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेने शिक्षक दिनाच्या निमित्ताने समाजासमोर प्रेरणादायी आदर्श ठेवला आहे.

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles