सावंतवाडी : समाजातील गरजूंच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करणारे हात, तरुणांच्या स्वप्नांना बळ देणारे प्रयत्न आणि कोकणच्या मातीत रुजलेल्या कला-संस्कृतीच्या संवर्धनासाठी झटणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद उर्फ संजू जगन्नाथ परब. त्यांच्या प्रदीर्घ आणि बहुआयामी सामाजिक कार्याची दखल घेत नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेने जिल्हास्तरीय आदर्श समाजभूषण पुरस्कारासाठी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे.
शिक्षक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेमार्फत प्रदान करण्यात येणारे जिल्हास्तरीय समाजभूषण पुरस्कार, उपक्रमशील आदर्श शिक्षक पुरस्कार आणि उपक्रमशील आदर्श शिक्षिका पुरस्कार यंदाही जाहीर करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्री. आत्माराम भिकाजी राऊळ यांनी पुरस्कारार्थींची नावे घोषित केली.
गरजूंच्या संकटात आधारवड ठरलेले संजू परब!
नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष व आश्रयदाते कै. श्रीपाद गोविंद तथा तात्यासाहेब पोकळे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जिल्हास्तरीय आदर्श समाजभूषण पुरस्कार यंदा संजू परब यांच्या सामाजिक योगदानाला बहाल करण्यात येणार आहे.
मडुरा तसेच सावंतवाडी परिसरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांवर आरोग्याचे संकट कोसळले, विवाहकार्याची जबाबदारी उभी ठाकली किंवा कौटुंबिक अडचणींनी जीवनाची वाट बिकट केली, अशा प्रसंगी परब यांनी अनेक कुटुंबांच्या मदतीला धावून जात वैयक्तिक आर्थिक मदतीतून माणुसकीची उब जपली आहे.
केवळ मदत करून थांबणे नव्हे, तर ‘मदतीवर जगण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभे राहा’ या विचारातून त्यांनी तरुणांना स्वावलंबी करण्यासाठी विविध उपक्रम राबविले. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत अनेक तरुणांना आत्मनिर्भरतेची दिशा देण्याचे कार्य त्यांनी केले आहे.
कोकणच्या कला-संस्कृतीचा वारसा जपण्याची धडपड!
कोकणची ओळख असलेल्या दशावतारी कलेला आणि कलावंतांना प्रोत्साहन देण्याबरोबरच खेळाडूंच्या कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी विविध स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन त्यांनी केले आहे. सामाजिक बांधिलकी, सांस्कृतिक जपणूक आणि युवकांना प्रोत्साहन या तिन्ही आघाड्यांवर त्यांनी सातत्याने काम केले आहे.
‘जनसेवा हीच ईश्वर सेवा’ हा विचार केवळ बोलण्यात न ठेवता तो प्रत्यक्ष कृतीत उतरविणाऱ्या परब यांच्या कार्याला त्यामुळेच समाजमान्यता मिळाली आहे.
नगराध्यक्षपदाच्या माध्यमातूनही शहरसेवेचा ठसा
सावंतवाडी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी शहरातील नागरिकांच्या विविध गरजा आणि समस्या जाणून घेत त्यांना आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले. सामाजिक कार्यासोबतच सार्वजनिक जीवनातही त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला.
गरजूंच्या डोळ्यातील अश्रू पुसण्यापासून तरुणांच्या हाताला काम देण्यापर्यंत आणि कोकणच्या कला-संस्कृतीला बळ देण्यापासून शहराच्या विकासासाठी योगदान देण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास हा सामाजिक बांधिलकीची व्यापक व्याख्या अधोरेखित करणारा ठरला आहे.
याच बहुआयामी कार्याची दखल घेत नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आणि नेमळे पंचक्रोशी शिक्षण संस्थेने संजू परब यांची जिल्हास्तरीय आदर्श समाजभूषण पुरस्कारासाठी निवड केली आहे.
शिक्षक दिनाच्या निमित्ताने होणारा हा सन्मान म्हणजे एका व्यक्तीचा गौरव नसून, ‘माणसासाठी माणूस’ म्हणून उभे राहणाऱ्या सामाजिक संवेदनशीलतेचा आणि सेवाभावाचा गौरव ठरणार आहे.



